मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नागपूर
मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचे नूतनीकरण करून खेळांडूसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विद्यापीठामार्फत कार्यवाही प्रगतीपथावर असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाची दुरुस्ती करण्याबाबतचा प्रश्न सदस्य विलास पोतनीस यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिकेत तटकरे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, क्रीडा संकुल दुरुस्तीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यादृष्टीने दुरुस्तीची कामे सुरू आहेत. क्रीडा संकुलातील जलतरण तलाव बंद केला जाणार नाही. यासाठी लागणारे आवश्यक पाणी सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील लोकप्रतिनिधींच्या सूचनाही विचारात घेऊन प्रत्यक्ष त्यांची क्रीडा संकुलात भेट आयोजित करण्यात येईल.