बीडमध्ये झालेल्या हिंसाचाराबाबत अद्याप एसआयटी का नेमली नाही ?
पप्पू शिंदे यांच्या गँगचा नेक्सस पोलीस शोधून काढणार का ?
जयंत पाटलांनी विधानसभेत गृहमंत्र्यांना घेरले
नागपूर :- बीड जिल्ह्य़ात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी आज विधानसभेत लक्षवेधी सुचना मांडण्यात आली. या चर्चेवेळी विविध प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच घेरले.
जयंत पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, इतका मोठा हल्ला होतोय आणि इंटेलिजन्सला कळू नये हे मला खरं वाटत नाही. मी खूप जबाबदारीने सांगतो, की बीड जिल्ह्याच्या एसपींना जिल्ह्यात काहीतरी होण्याची शक्यता आहे अशी चेतावणी तीन दिवस आधीच दिली होती. त्यामुळे त्यांच्याकडून हलगर्जीपणा झालेला आहे यात शंका नाही असा गंभीर आरोप त्यांनी सभागृहात केला.
माजलगाव येथे प्रकाश दादा सोळंके यांच्या घरावर हल्ला झाला त्या फुटेजमध्ये पोलीस दिसत आहेत. सर्व बीड शहर जळत असताना एसपी माजलगावला जाऊन बसले आणि तिथून बाहेर आलेच नाहीत. लोकसंख्येच्या मानाने पोलीस कमीच असतात. पण हल्लेलखोरांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरिंग का केले नाही? नंबरिंग करून हल्ले करण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरासमोर पोलीस मुख्यालय असताना हा प्रकार घडतो. लोकप्रतिनिधींचाच जीव धोक्यात असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय? लोकप्रतिनिधींचे संरक्षण करण्याची ताकद देखील आता महाराष्ट्र पोलीसमध्ये राहिलेली नाही असं म्हणत त्यांनी गृहविभागाच्या भोंगळ कारभारावर बोट ठेवले.
या प्रकरणी अद्याप एसआयटी स्थापन न केल्याचे कारण काय? ती कधी स्थापन केली जाणार? असा सवाल उपस्थित करत असताना फिरत असलेला मॉब कोणत्या अमली पदार्थाच्या प्रभावाखाली होता हे देखील पाहणे गरजेचे आहे. पप्पू शिंदे नामक एक कॉर्डिनेटर हा एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाचा भाचा आहे. पप्पू शिंदे आणि गॅंग ही त्या शहरात या सर्व हल्ल्याचे नेपथ्य करत होते. त्यांचे नेक्सस पोलीस शोधून काढणार का? अशी विचारणा सभागृहात केली.