शासनाच्या सर्व रक्तपेढ्यांमध्ये अँलिकॉट बसवणार
आरोग्य मंत्र्यांची विधानसभेत घोषणा
नागपूर, दि. 13
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील 31 शासकीय रक्तकेंद्रामध्ये अँलिकाँट
मशीन उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी सदरचे मशीन येत्या एका महिन्यात बसवण्यात येतील, अशी घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत केली.
रक्ताशी संबंधित विविध प्रकारचे आजार असलेल्या लहान मुलांमध्ये प्रौढ रुग्णांइतकी रक्ताची गरज लागत नसल्यामुळे रक्त वाया जाऊ नये यासाठी रक्तपेढयांमध्ये अँलिकॉट मशीन (रक्ताच्या लहान पिशव्या तयार करणारे यंत्र) उपलब्ध असणे गरजेचे आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ३१ रक्तपेढयांपैकी केवळ ८ रक्तपेढयाध्ये तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील १४ रुग्णालयांपैकी केवळ ३ ठिकाणी अँलिकॉट मशीन ही सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे या मशीन तातडीने उपलब्ध करून द्या अशी मागणी करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी तारांकित प्रश्न विधानसभेत उपस्थितीत केला होता.
त्याला उत्तर देताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले की, अँलिकॉट मशीन हे लहान यंत्र असून रक्ताची ३५० मि.ली. ची पूर्ण बॅग गरजेप्रमाणे विभाजन करुन बालरुग्णांना अचूक तेवढेच रक्त देण्यासाठी या मशीनचा उपयोग होतो. यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. सध्या कार्यरत असलेले रक्तकेंद्र तंत्रज्ञ ही मशीन वापरु शकतात.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील 31 शासकीय रक्तकेंद्रामध्ये अँलिकाँट
मशीन उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी सदरचे मशीन येत्या एका महिन्याच्या कालावधीमध्ये आवश्यक ती खरेदीची प्रक्रिया अवलंबून खरेदी करण्यात येतील.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या वैद्यकीय अधिक्षक यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तिथेही मशीन एक महिन्यात उपलब्ध करुन देण्यात येतील शिवाय खाजगी रक्तपेढ्यांनाही सूचना देण्यात येतील, असे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.