सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी
पंतप्रधानांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कोणावर केले पवार साहेबांचा सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब
पुणे दि.२ डिसेंबर
राज्यातील काही भागात दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे. तर काही भागात अतिवृष्टीनं शेतीचं, पिकाचं, फळबागाचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे करण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. हे प्रश्न विधानसभेत मांडले जातील पण महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
राज्यातील दुष्काळ परिस्थितीवर आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि खासदारांची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीनंतर पवार साहेब यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
शरद पवार साहेब म्हणाले की, अलिकडेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या काही सहकार्यांसमवेत बैठक घेतली होती. त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दौरेही झाले. या दौर्यामध्ये दोन गोष्टी आढळल्या. त्या म्हणजे, राज्याच्या काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेंकरने पाणीपुरवठ्याच्या मागण्या आहेत, अशी पाणी टंचाई आहे. तर काही भागांमध्ये अतिवृष्टीने शेतीचे, काही परिवारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे काही ठिकाणी सुरु आहेत. मात्र त्याचा वेग अत्यंत कमी आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहे. राज्य सरकारने या लोकांना मदत करण्याची भूमिका तातडीने घेतली पाहिजे. तसा सूचनावजा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे दिला आहे. हीच भूमिका राज्य सरकारचे अधिवेशन होईल तेव्हा मांडण्यातच येईल. पण शक्यतो मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने जर याबाबत वेळ दिला तर त्यांच्या नजरेस या सर्व गोष्टी पडतील. अशा प्रकारची चर्चा आजच्या बैठकीत झाली असल्याचे पवार साहेब यांनी सांगितले.
शरद पवार साहेब म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मी होतो, सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयाच्या बरोबर काही वेगळं करण्याचे कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की भाजपसोबत जायचे नाही. कालच्या भाषणात असं एक सांगितलं गेलं की अनिल देशमुख यांना देखील भाजपसोबत जायचं होतं. पण देशमुखांनी काल लगेच जाहीर केलं की असं मत मी कधी मांडलं नाही. एवढच नाही तर हा रस्ता आपला नाही हे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले होते. ते असं सांगत असताना देखील त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे योग्य नाही, असे शरद पवार साहेब यांनी सांगितले.
शरद पवार साहेब म्हणाले की , माझ्याकडून त्यांना कधी बोलवण्यात आले नव्हते. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षातील कोणत्याही सदस्याला माझ्याशी संवाद ठेवण्याचा अधिकार आहे. त्यावेळी अनेक लोक लपवत होते. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्याची चर्चा झाली होती. ते ज्या रस्ताने जाण्याचा विचार करत होते. तो विचार आम्हाला लोकांना मान्य नव्हता असे शरद पवार साहेब यांनी सांगितले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांना आम्ही मतं मागितली होती ती मतं भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही तर भाजप आणि त्यांच्या विचारधारेविरोधात होती. आमच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता म्हणून आमचे लोक निवडून आले. त्यामुळे जो कार्यक्रम मांडला, भूमिका मांडली त्याच्याविरुद्ध काही सूचविले असेल तर ती लोकांशी फसवणूक आहे. त्यामुळे ते करणे योग्य नाही अशी भूमिका माझ्यासह अनेक सदस्यांची होती, असे शरद पवार साहेब यांनी सांगितले.
शरद पवार साहेब म्हणाले की, पक्ष सोडणारे पुन्हा विधानसभेत दिसत नाहीत, याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. त्याचबरोबर माझ्याबरोबर किती आमदार आहेत, ते आज सांगणार नाही. ते योग्यवेळी सांगणार नरेंद्र मोदी यांनी भर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे हे आरोप नेमके कुणावर केले ते तुम्हीच शोधा, असा सूचक सवालही पवारसाहेबांनी पत्रकारांनाच केला. इंडिया बैठकीबाबत विचारलेल्या प्रश्नावर पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या की दिल्लीत इंडियासंदर्भात बैठक होईल, असेही शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब पुढे म्हणाले की, प्रफुल पटेल यांना पराभूत होऊनही मंत्रिपंद दिलं, त्याची खंत आहे. लोक पक्ष का सोडून जातात यावर प्रफुल पटेलांनी एक प्रकरण त्यात लिहावं. तसंच ईडीच्या त्यांच्यावरील कारवाईवरही त्यांनी प्रकरण त्या पुस्तकार लिहावं असा सल्लाही पवार साहेब यांनी दिला. ईडीने प्रफुल पटेल यांच्या घराचा ताबा घेतला होता. त्यावेळी काय-काय झालं त्याबद्दलही त्यांनी लिहावं. ते वाचून आमच्याही ज्ञानात भर पडेल असेही शरद पवार साहेब म्हणाले.
शरद पवार साहेब म्हणाले की, पवार विरुद्ध पवार कसं होईल. वास्तविक बारामतीच्या खासदार या सुप्रियाताई सुळे आहे. आमच्या पक्षाचे अध्यक्ष ज्या उमेदवाराला तिकीट देतील तो निवडणूक लढवेल. शेवटी लोकशाही आहे. विरोधकांना त्यांची भूमिका घेऊन जनतेमध्ये जाण्याचा लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे. लोकांना काय सांगायचं याची चिंता त्यांना आहे. त्यामुळे ते वारंवार आम्हीच राष्ट्रवादी असल्याचं सांगत आहेत. मात्र लोकांना सत्य माहीत आहे. त्यामुळे मतदान करताना शेवटी जनता काय निर्णय घ्यायचा ते ठरवेल.
शरद पवार साहेब म्हणाले की, योग्य मागण्यांसाठी आंदोलन करायला काहीच हरकत नाही. मात्र राज्यात सामाजिक ऐक्य जतन केलं पाहिजे. जाती-जातीमध्ये अंतर वाढायला नको, ही आमची भूमिका आहे. आंदोलकांनी त्यांची भूमिका मांडावी. त्यातून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.