करमणूकबातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते समूह विद्यापीठ राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

मुंबई,

 

समूह विद्यापीठात सहभागी होताना महाविद्यालयाचे अनुदान कमी होणार नाही किंवा त्यांची शैक्षणिक, आर्थिक शिस्त यात कोणताही बदल होणार नाही. समूह विद्यापीठात सहभागी होण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केले.

सिडनहँम वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित समूह विद्यापीठ स्थापनेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या राज्यस्तरीय परिषदेला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उपसचिव अजित बाविस्कर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, तंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना शैक्षणिक क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. समूह विद्यापीठ हा असाच एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, ज्यामुळे उच्च शिक्षणाची गंगोत्री तळा-गाळापर्यंत पोहोचण्यास आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल.

समूह विद्यापीठांच्या माध्यमातून शहर किंवा परिसरातील महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांच्या एकत्रीकरणातून विविध प्रकारची मानवी आणि पायाभूत संसाधने एकत्रित आणणे व या संसाधनांचा प्रभावी वापर करून उच्च शिक्षणामध्ये सुसूत्रता, नेमकेपणा, बहु/आंतरशाखीय अभ्यासक्रम, दर्जा आणि कौशल्य विकासाच्या संकल्पनेला अधिक बळकट करण्याचा उद्देश आहे, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले की, राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापन्याकरिता शासनाने मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली आहे. यामुळे विद्यापीठांवरील प्रशासकीय भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील.

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना उच्च शिक्षण संचालक श्री. देवळाणकर म्हणाले की, राज्यात अनेक स्वायत्त शैक्षणिक संस्थांचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक दर्जा उत्तम आहे. शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित अध्यापक तसेच समूह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय, संस्था समूह विद्यापीठासाठी इच्छुक आहेत. यासाठी याविषयी सविस्तर चर्चा, विचार मंथन व्हावे यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button