तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अत्याधुनिक बसस्थानकावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारावे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुंबई,
राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी देहू-आळंदी-पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत मंत्रालयातील त्यांच्या दालनात आढावा बैठक घेतली. या बैठकीस आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के. एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. शिवाय या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.