बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

सिंधुदुर्ग येथील नौसेना दिवस, शिवछत्रपतीं पुतळा अनावरण समारंभाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सिंधुदुर्ग- राजकोट येथील भव्य पुतळ्याचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार अनावरण

मुंबई,

 

भारतीय नौसेनेच्यावतीने यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर) सिंधुदुर्ग किल्ला येथे भव्य – दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने मालवण-राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या तयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आढावा घेतला.

‘शिवछत्रपती भारतीय आरमाराचे जनक आहेत. तसेच त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे, त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम आपल्यासाठी गौरवास्पद असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सर्व यंत्रणांनी या कार्यक्रमांचे समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश दिले.

या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास व उद्योजकता नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर, कॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, कमोडोर एस.के. रॉय, संदीप सरना, गोकुल दत्ता, आशिष शर्मा, विक्रम बोरा, कॅप्टन चैतन्य, उपस्थित होते.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार यंदाचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा करण्यात येत आहे. नौसेना दलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांच्या पाहणीअंती सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली आहे.

बैठकीत नौसेना अधिकाऱ्यांनी नौसेना दिवसाच्या अनुषंगाने तसेच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या अनुषंगाने नियोजित विविध कार्यक्रम, त्यांची रूपरेषा आणि त्यातील वैशिष्ट्ये याबाबत सादरीकरण केले. या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी सरखेल कान्होजी आंग्रे तसेच हिरोजी इंदुलकर यांचे वंशज यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्र किनारी राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा ४३ फूट पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच शिवछत्रपतींच्या दैदिप्यमान जीवनकार्याचा आढावा घेणारे कलादालन साकारण्यात आले आहे. नौसेना दिवस कार्यक्रमात नौसेनेच्या विविध युद्ध नौका, लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत. तारकर्ली आणि मालवण समुद्र किनारी यानिमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विदेशातील नौसेनेचे वरिष्ठ अधिकारी तसेच देश-विदेशातील मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रस्ते, विविध पायाभूत सुविधा आदींचा आढावा घेण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button