राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
बालकांच्या हक्कासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘बालस्नेही पुरस्कारा’ने गौरव
मुंबई,
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला निधी व आयोगाच्या बळकटीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, युनिसेफ, कम्युटेड कम्युनिटीज डेव्हलपमेंट ट्रस्ट (CCDT), होप फॉर चिल्ड्रन इंडिया, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “बाल स्नेही” पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात मंत्री कु. तटकरे बोलत होत्या.
यावेळी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष सुशीबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विशेष पोलिस महानिरीक्षक (महिला व अत्याचार) दीपक पांडे, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य सचिव शिवराज पाटील, बचपन बचाव आंदोलनाच्या संचालक संपर्ण बेहरा, युनिसेफच्या मुख्य अधिकारी राजलक्ष्मी नायर, होप फोर चिल्ड्रन इंडियाच्या कॅरोलिनी व्हॅल्टन, महिला व बालविकास उपायुक्त राहुल मोरे उपस्थित होते.
मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, राज्य महिला आयोग व महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या विकासासाठी शासन विशेष लक्ष देत आहे. सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा हक्क असून बालसुधार गृह, महिला व बालविकास आयुक्तालय, एकात्मिक बालविकास आयुक्तालय यांच्यामार्फत विविध योजना प्राधान्याने राबवत आहोत. बालधोरण आखण्यात येत असून त्यामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासावर आधारित उपक्रम व योजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्ष नेते श्री. वडेट्टीवार म्हणाले की, देशातील बालक सुदृढ देश नेहमीच समृद्ध राहील. राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून बालकांसाठी सुरु असलेले काम अभिनंदनीय आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शहा म्हणाल्या, राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकास, बाल हक्क संरक्षण, त्यांची सुरक्षा, आरोग्य इ. अनेक महत्त्वपूर्ण विषयावर काम करणाऱ्या संस्था व अधिकारी या सकारात्मक पद्धतीने कार्य पार पाडत आहेत. अशा व्यक्ती व संस्थांना “बाल स्नेही” पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हे काम असेच सातत्याने करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, परभणीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल, धुळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी जलज शर्मा, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा पोलीस अधिक्षक परभणी रागसुधा आर., धुळे जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., नाशिकच्या आशिमा मित्तल, चंद्रपूरचे विवेक जॉन्सन, आयुष प्रसाद यांना सन्मानित करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अकोला, ठाणे, धुळे, नाशिक, परभणी, कोल्हापूर, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, जालना, अमरावती बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, बालगृह, बाल कल्याण समिती इ. प्रशासकीय यंत्रणा व संस्था यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्य सायली पालखेडकर, ॲड. नीलिमा चव्हाण, ॲड. संजय सेंगर, जयश्री पालवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, ठाणे, महेंद्र गायकवाड, मुंबई शहर बी. एच. नागरगोजे यावेळी उपस्थित होते.