सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये केशरी व पिवळ्या रेशनकार्ड धारकांनी उपचाराचा लाभ घ्यावा – राजेश शर्मा
मुंबई,
सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये केशरी व पिवळ्या रेशन कार्डधारकांना उपचाराची सुविधा दिली जाते व ४० ICU बेड्स उपचारासाठी ताब्यात घेतले आहेत असे महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. मुंबईतील जोगेश्वरी, अंधेरी व आसपासच्या लोकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी केईएम व इतर दुरच्या हॉस्पिटलमध्ये जाण्याऐवजी अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल्समध्येच जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहन मुंबईचे माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी केला आहे.
यासंदर्भात राजेश शर्मा पुढे म्हणाले की, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये १५०० बेड्सची क्षमता आहे पण सध्या हे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने सुरु नाही, त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. हे हॉस्पिटल महानगरपालिकेने ताब्यात घेऊन केईए, नायर, सायन हॉस्पिटल प्रमाणे चालवले तर लाखो मुंबईकरांना वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येईल. या हॉस्पिटलमध्ये सध्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचा जास्तीत जास्त मुंबईकरांनी लाभ घ्य़ावा. सेव्हन हिल्स हॉस्पिटल मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेऊन पूर्ण क्षमतेने सुरु करावे अशी वारंवार मागणी केली जात असतानाही मुंबई महानगरपालिका त्याकडे गांभिर्याने पहात नाही, चालढकल करत आहे. आतातरी मुंबई महानगरपालिकेने तातडीने हालचाल करुन सेव्हन हिल्स हॉस्पिटल ताब्यात घ्यावे व पूर्ण क्षमतेने चालवावे ज्याचा मुंबईकरांना फायदाच होईल.