माधुरी दीक्षित लढवणार उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून चुनाव
पूनम महाजन यांचे तिकीट रद्द !
श्रीश उपाध्याय
मुंबई
चित्रपट अभिनेत्री माधुरी दीक्षित उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त राजकीय सूत्रांकडून मिळाले आहे. त्यामुळे भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘संपर्क फॉर सपोर्ट’ मोहिमेअंतर्गत या वर्षी जूनमध्ये अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी माधुरी दीक्षित यांची भेट घेतली. तेव्हापासून माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती, मात्र त्यांचा मतदारसंघ निश्चित झाला नव्हता.
गणेशोत्सवादरम्यान 23 सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची भेट झाली. याच बैठकीत उत्तर-मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्या जागी आगामी लोकसभा निवडणुकीत माधुरी दीक्षितला उमेदवारी देण्यावर चर्चा झाली.
पूनम महाजन यांच्या लोकसभा मतदारसंघाबाबतच्या उदासीनतेमुळे पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व आधीच नाराज होते. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने राहणारे उत्तर भारतीय मतदार पूनम महाजन यांच्यावर नाराज आहेत. पक्षाच्या अंतर्गत पाहणीदरम्यानही पूनम महाजन यांच्याप्रती स्थानिक मतदारांची नाराजी दिसून आली.
आता याच मतदारसंघातून माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याच्या वृत्तामुळे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून पूनम महाजन यांचे तिकीट रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी माधुरी दीक्षित यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.