चित्रपट क्षेत्रातील कलाकार , कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची ग्वाही
मुंबई
चित्रपट क्षेत्रातील कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारी पातळीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील,अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली.राष्ट्रीय चित्रपट कामगार संघटनेच्या सदस्यांना दिवाळीनिमित्त फराळ आणि शिधा वाटपाच्या कार्यक्रमात श्री.बावनकुळे बोलत होते.भाजपा प्रदेश उपाध्यक्ष(मुख्यालय)माधव भांडारी, संघटनेच्या अध्यक्ष आणि प्रख्यात अभिनेत्री वर्षा उसगावकर,भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
श्री . बावनकुळे यांनी सांगितले की,चित्रपट कामगारांचे मांडण्यात आलेले प्रश्न सोडविण्यासाठी भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार संघटनेला संपूर्ण सहकार्य करेल. त्यासाठी कामगार मंत्र्यांसमवेत बैठकही आयोजित करण्यात येईल.प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी सांगितले की चित्रपट कामगार,तंत्रज्ञ यांच्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना उपयुक्त ठरणाऱ्या आहेत.आयुष्मान भारत,ई श्रम,विश्वकर्मा,पंतप्रधान आयुर्विमा आणि अपघात विमा या केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ चित्रपट कामगारांना मिळवून देण्यासाठी पक्ष संघटनेकडून सहकार्य केले जाईल.संघटनेच्या अध्यक्ष अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी कलाकार,तंत्रज्ञ,कामगार यांना भेडसावणाऱ्या वेगवेगळया समस्या मांडल्या.यावेळी श्री. बावनकुळे यांच्या हस्ते संघटनेच्या वेबसाइटचे उद्घाटन करण्यात आले.