मुंबईत प्रदूषण करणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर सीसीटीव्हीची नजर ठेवा
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
मुंबई, दि. 26 आक्टोबर
मुंबईत हवा प्रदुषणास कारणीभूत ठरलेल्या 6 हजार बांधकाम साईटवर सीसीटीव्ही लावून महापालिकेने लक्ष ठेवावे तसेच मुंबईत प्रदुषण करणारी अवजड वाहने, माहुलचे उद्योग, बेकऱ्या, भट्या याबाबत तातडीने योग्यती कारवाई करावी अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्दारे केली आहे.
मुंबईत हवा प्रदूषणात कमालीची वाढ झाली असून मुंबईकरांचा श्वास गुदमरुन गेला आहे. याला जबाबदार उबाठा आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे असल्याची टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे. कोविड काळात बिल्डरांना तत्कालीन ठाकरे सरकारने कटकमिशनसाठी प्रिमियम सवलतीची खैरात केली त्यामुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणात मुंबईत बांधकामे सुरु झाली असून त्यामुळे धूळ, धूर यामुळे मुंबईची हवा दुषीत झाली आहे. सोबत गेल्या पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना उबाठा ने मुंबईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी शास्त्रशुद्ध पध्दत न अवलंबल्याने डंम्पिंग ग्राऊंडवर रागणाऱ्या आगी, धूर, विषारी वायू यामुळे ही मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून याला जबाबदार उबाठा असल्याचे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
दरम्यान याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी काही बाबींकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. यामध्ये त्यांनी सर्व बांधकाम साईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत त्यावर महापालिकेने लक्ष ठेवावे. तसेच याबाबत तज्ञांची समिती गठीत करण्यात यावी, तसेच माहुलमधील प्रदूषणकारी कंपन्या अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत विचार करण्याची गरज असून त्यासाठी कार्यवाही करण्यात यावी, मुंबई परिसरातील उद्योगांसाठी 2 दशलक्ष टन कोळसा आणि प्रदूषणकारी इंधन वापले जाते त्यांना नैसर्गिक गॅस वापर करणे बंधनकारक करण्यात यावे,मुंबईतील बेकरी, लॉन्ड्री, बेकायदेशीर भट्ट्या लाकूड, कोळसा वापरतात आणि हानिकारक धूर सोडतात. त्यांना गॅस वापरणे बंधनकारक करण्यात यावे, मुंबईतील प्रक्रिया न केलेला ओला, अन्न, प्राण्यांचा कचरा सीएनजी इंधनात रूपांतरित केल्यास 350 कोटीचे इंधन उपलब्ध होऊ शकते , त्यामुळे कचरा जाळणे व प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डांमध्ये 30 बायो CNG प्लांट्सची निर्मिती करण्यात यावी, मुंबईत प्रवेश करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीसह सर्व अवजड वाहनांची प्रदूषण उत्सर्जन नियंत्रणासाठी तपासणी करणे आवश्यक आहे, अशा विविध मागण्या पत्रात अँड आशिष शेलार यांनी केल्या आहेत.