उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावे ही मुख्यमंत्री शिंदे यांची इच्छा – महेश तपासे
मुंबई ९ ऑक्टोबर :
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावं अशा प्रकारचे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी नुकतंच केलं.
शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे म्हणाले महाराष्ट्रात श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसले असले तरी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम आहेत आणि वेळोवेळी याची जाणीव ते मुख्यमंत्री शिंदेंना व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करून देतात.
विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या टांगत्या तलवारीचा रिमोट कंट्रोल श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे हे संजय शिरसाठ यांना व मुख्यमंत्री शिंदे यांना माहीत असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व करावे अशी इच्छा प्रकट करण्यात आली. अर्थात ही सदिच्छा फडणवीस यांच्या प्रेमापाई नव्हे तर मुख्यमंत्री कार्यालयातील कारभारामध्ये वाढत्या हस्तक्षेपामुळे केली असल्याचे तपासे म्हणाले.
शिरसाट यांचा बोलवता धनी कोण याचा शोध लावणे कठीण नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच अशी इच्छा असावी असा टोला महेश तपासे यांनी लगावला.