खोके सरकारला पक्ष फोडण्यासाठी दिल्लीत जायला वेळ,पण रुग्णालयाला निधी द्यायला पैसे नाही
जालन्यातील आंदोलकांवरील तो हल्ला मराठी माणसावर हल्ला होता
दोन मराठी पक्ष फोडण्याचे पाप दिल्लीतील अदृश्य हातांनी केले
शेतकऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष, सरकार केवळ दिल्ली वारीत व्यस्त
ही आणीबाणी आहे का पत्रकारांवरील छापेमारीवरून सुप्रिया सुळेंचा मोदी सरकारला प्रश्न
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे
नांदेड
दि 5 ऑक्टोंबर
केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करून पक्ष घर फोडण्याचा काम सध्या सुरू आहे. केंद्र सरकारकडून ईडी, इन्कम टॅक्स ,सीबीआय या तीन संस्थेचा उपयोग विरोधकांना आणि विरोधात लिहिणाऱ्या पत्रकारांना दाबण्यासाठी करण्यात येत आहे. भाजपकडून 24 तास विरोधकांवर खोटे आरोप करून बदनाम करण्याचे काम सातत्याने सुरू असते. राज्यामध्ये सध्या आरोग्य आणि शैक्षणिकता वाढवण्याऐवजी सध्याचे शिंदे फडणवीस सरकारच्या राज्यामध्ये दारूचे दुकान जास्ती वाढत आहे. ही बाब महाराष्ट्राच्या संस्कृतीला पटण्यासारखी नाही आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांचे मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती यानंतर आज शासकीय रुग्णालयात जाऊन सुप्रियाताई सुळे यांनी तेथील रुग्णांची तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सुप्रियाताई सुळे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची स्थिती सर्वांनाच माहित आहे. मराठा धनगर लिंगायत समाजाच्या वतीने आरक्षण मिळावे याकरिता आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलकांवर विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे हल्ला केला तो हल्ला मराठी माणसावर केला आहे. या सर्व घटनेला गृहमंत्री जबाबदार आहे. असेही यावेळी सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
राज्यातील नांदेड ,संभाजी नगर, नागपूर आणि ठाणे या मधील ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या प्रमाणात रुग्णांचा मृत्यू होत आहे. या सर्व घटनेला राज्यातील खोके सरकार जबाबदार आहे. या सरकारमधील या विभागाच्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यायला पाहिजे होता. मात्र राज्यातील नैतिकताहीन सरकारला सर्वसामान्य जनतेने संदर्भात कुठलेही सदभावना नाही आहे. असे देखील यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
देशातील केंद्र सरकारने राज्यातील दोन मराठी पक्ष संपवण्याचे कटकारस्थान केले आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून संपवण्याचे कटकारस्थान दिल्लीतील अदृश्य हातांनी केले आहे. दिल्लीतील अदृश्य हाताकडून महाराष्ट्र संपवण्यासाठी कटकारस्थान सुरू आहे. महाराष्ट्र मधील उद्योग देखील पळून दुसऱ्या राज्यात नेलै जातात मराठी माणसावरच एवढा अन्याय का? मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं यश यांना दिसत नाही का? एवढे खासदार निवडून देऊन सुद्धा? अशाप्रकारे महाराष्ट्राला हा अदृश्य हात दुखवणार असेल तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करतो फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करतो जेव्हा हिमालय ला गरज भासली तेव्हा महाराष्ट्राची सह्याद्री मदतीला गेलेली आहे. दिल्ली समोर सध्याच खोके सरकार झुकलं आहे. त्याच्या विरोधात मराठी च्या अस्मितेसाठी आमची लढाई आहे असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
खासदार सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या, आपल्या राज्यातली शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर आहे. सोयाबीन, कपाशी पिकांचं नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पिकाला हमीभाव नाही. राज्य सरकारचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. हे लोक केवळ खासगी विमानाने दिल्ली दौरे करण्यात व्यस्त आहेत. केवळ आपलं सरकार वाचलं पाहिजे याचीच त्यांना काळजी आहे. २०० आमदार असले तरी त्यांना केवळ सरकार टिकवण्याची काळजी आहे. मी विरोधक म्हणून बोलत नाही. परंतु, कोणीतरी खरं बोललं पाहिजे.
सुप्रियाताई सुळे यावर सविस्तर बोलताना म्हणाल्या, देशात जो खरं बोलेल त्याच्यामागे आईस आहे. आम्ही गेल्या काही वर्षांपासून हेच म्हणतोय. आता सर्वोच्च न्यायालयानेही तेच म्हटलं आहे. जो खरं बोलेल त्याच्यामागे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा ससेमिरा आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की सरकारने या आईसचा वापर कमी करावा. ईडी, सीबीआय आणि आयटीचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयाने केला आहे.
देशात इंडिया आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी सत्तेसाठी एकत्रित आलेली नाही आहे. आम्ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी एकत्रित आलो आहे. तसेच संविधानाचा मान सन्मान राखण्यासाठी इंडिया आघाडी सर्वजण एकत्रित आले आहे. देशात केंद्र सरकारकडून ज्या प्रमाणात दडपशाही सुरू आहे या दडपशाहीला थांबवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे असे देखील यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कालच देशात पत्रकारांवर छापेमारी करण्यात आली. त्या पत्रकारांची काय चूक होती? प्रत्येक वर्तमानपत्र म्हणतंय की काहीच पुरावे मिळाले नाहीत. परंतु, जो विरोधात बोलेल त्याच्याविरोधात खटला भरवला जाईल. आयटीची नोटीस पाठवली जाईल. आधी बीबीसी आणि आता न्यूजक्लिकवर कारवाई करण्यात आली आहे. ही आणीबाणी आहे का? इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली होती. परंतु, त्या म्हणाल्या तरी होत्या की, आणीबाणी लागू करत आहोत. परंतु, आता देशात सगळेच घाबरत आहेत. देशात खूप संघर्षाचा काळ सुरू आहे.
डॉक्टर आणि पत्रकार यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर त्यांना कठोर शिक्षा व्हावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार असताना स्वर्गीय आर आर पाटील यांनी कायदा केला होता. कोणतेही डॉक्टर असो त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला आणि त्यांच्याशी असे कृत्य करणे हे चुकीचे आहे. या कृत्याचा मी निषेध करते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या विषयासंदर्भात मी देखील चर्चा करेल असे देखील यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नसेल. मात्र भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवार साहेबना नावं ठेवावीत. मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. नांदेडची घटना वेदना देणारी आहे. मृतांचा आकडा 24, 38 , 41 हे नंबर फार दुःखद आहेत. ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जातं. यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र नांदेडला येत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा मी निषेध करते असंही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
मला इथं आता एक माता भेटली. तिचं बाळ दगावलं. ती फार दुःखात होती. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यात अशाच घटना घडत आहेत. पालकमंत्री पदासाठी हे लोक दिल्लीपर्यंत जातात. मग इथे का येत नाहीत? सर्वसामान्य जनतेची हत्या या खोके सरकारने केली आहे. खोके सरकार घरं फोडण्यात मग्न आहे. मात्र लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही असेही यावेळी सुप्रियाताई सुळे म्हणाले.