कांदिवली पूर्वमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते शुभारंभ
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वत्र ‘एक साथ एक तास स्वच्छता’ या अभियानास उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली असून येणाऱ्या काळात हे अभियान संपूर्ण विधानभेत पूर्ण ताकदीने राबवणार असल्याचे प्रतिपादन भाजप नेते आणि कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी केले. कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिवार, आकुर्ली रस्ता येथे रविवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
आमदार भातखळकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला संपूर्ण देशात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत हे अभियान राबवले जात आहे. कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला तीन ठिकाणी आणि कांदिवली पूर्वमध्ये ठिकठिकाणी या अभियानाचा शुभारंभ झाला आहे. येणाऱ्या काळातही स्वच्छता अभियान आम्ही पूर्ण ताकदीने राबवू. यावेळी कांदिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर ते आकुर्ली रस्ता अशी तासभर स्वच्छता करण्यात आली.
या अभियानात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महापालिकेचे कर्मचारी तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, एनएनएसचे विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कांदिवली पूर्व विधानसभेत सर्वत्र स्वछता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.