सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती
त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल
नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दुर्दैवी प्रकारावर जयंत पाटील यांनी व्यक्त केला संताप
मुंबई :-
नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात चोवीस तासात तब्बल २४ जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यात १२ नवजात बालकांचा समावेश आहे. या दुर्दैवी प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांनी कामाप्रती कार्यक्षमता दाखवली असती तर ही वेळ आली नसती असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी प्रकारानंतर नांदेडहून येणारी बातमी वेदनादायी आहे.
पुढे ते म्हणाले की, रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला. रुग्णांना वेळेवर औषधे पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला अशी प्राथमिक माहिती मिळते आहे. जितकी कार्यक्षमता स्वतःच्या प्रचारासाठी, विरोधी पक्ष फोडण्यासाठी वापरता, तितकी कार्यक्षमता जर कामाप्रती दाखवली असती तर ही परिस्थिती आली नसती. सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे आज अनेक आयांनी आपली लेकरे गमावली आहेत. त्यांच्या अश्रूंची किंमत सरकारला मोजावी लागेल असा इशारा दिला.