नंदुरबारमहाराष्ट्र
Trending
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील गणेश मंडळ व डी.जे. / डॉल्बी धारकांचा सत्कार.!!
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांची विशेष उपस्थिती...!!
दिनांक 14/09/2023
पल्लवी प्रकाशकर- जिल्हा नंदुरबार
आज दिनांक 14/09/2023 रोजी नंदुरबार शहरातील राजपुत लॉन्स येथे मागील वर्षी जिल्ह्यातील गणेश मंडळानंी डी.जे. / डॉल्बीमुक्त न वाजविता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करणाऱ्या गणेश मंडळांचा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित यांचे हस्ते गौरव करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच सदर कार्यक्रमासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील हे देखील उपस्थित होते.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी मागील वर्षी एका महत्वाच्या अभियानाची सुरुवात केली होती, विविध सण / उत्सव दरम्यान विशेषत: गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करणे. सण / उत्सव काळात डी.जे. व डॉल्बी साऊंड सिस्टीम न वाजविता पारंपारिक वाद्य वाजवावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक मंडळानी पोलीस दलाच्या आवाहनास उत्तम असा प्रतिसाद देत पारंपारिक वाद्ये वाजवून नंदुरबार जिल्हा डी.जे. मुक्त व डॉल्बी मुक्त करण्याचा प्रयत्न केला होता. डी.जे. व डॉल्बी मुक्त नंदुरबार जिल्हा म्हणून महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे.
नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित व नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचे नंदुरबार शहरातील राजपुत लॉन्स येथे आगमन होताच जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यावेळी जिल्हा पोलीस दलातील बँड पथकाने देशभक्तीपर गीत सादर केले. त्यानंतर दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना.श्री. विजयकुमार गावित यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले की, ” जिल्हा पोलीस दलातर्फे डी.जे./डॉल्बीमुक्त जिल्हा हा एक चांगला उपक्रम राबविला जात असून त्यात ते यशस्वी देखील झालेले आहे. देशात विविध जाती, धर्माचे लोक एकत्र राहातात. प्रत्येक जातीचे, धर्माचे विविध सण मोठ्या उत्साहात साजरे होतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असतात, परंतु सण उत्सव साजरे करतांना सामाजिक सलोखा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नागरिक एकमेकांच्या सण उत्सावात सहभागी होवून सौहार्दाचे व शांततेचे वातावरण निर्माण करुन सण उत्सव साजरे करतात, याचा त्यांना अभिमान असल्याचे सांगितले. तसेच कोणताही सण उत्सव अशांततेच्या वातावरणात पार पडू नये, त्यामुळे दुरावा निर्माण होत असतो. दुरावा निर्माण होण्यासाठी वेळ लागत नाही मात्र जवळ येण्यासाठी खूप वेळ लागत असतो. शहरातील मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या निर्णयामुळे निश्चितच जातीय सलोख्याचे वातावरण राहिल. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात गणेश मंडळांकडून डेकोरेशनसाठी तयार करण्यात आलेले विविध देखावे हे समाजोपयोगी व नवीन पिढीला प्रेरणादायी ठरतील असे असले पाहिजेत. असे देखावे दाखवा की ज्यामुळे मनुष्याच्या जीवनात बदल होईल, संस्कृतीचा बोध होईल तसेच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण शांततेत व उत्सहाच्या वातावरणात साजरे करा असे सांगितले. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून गुन्हेगारीवर वचक निर्माण केला आहे. ” पोलीस दल करीत असलेल्या कामाचे कौतूक करून त्यांचे अभिनंदन केले.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.डॉ.श्री.बी.जी.शेखर पाटील यांनी मार्गदर्शनपर भाषणात, ” पर्यावरणाची काळजी घेणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न देखील केले पाहिजे. डी.जे. व डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला म्हणून नंदुरबार जिल्ह्याची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचा त्यांना सार्थ अभिमान आहे. यावर्षी अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद हे दोन्ही महत्वाचे सण एकाच दिवशी येत आहेत, परंतु मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद हा सण अनंत चतुर्दशीच्या दिवशी साजरा न करता दिनांक 01 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. मुस्लिम बांधवानी घेतलेल्या निर्णयामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल. सण साजरा करतांना इतरांना त्रास होणार नाही किंवा कायद्याचा आदर राखावा ” असे यावेळी सांगून जिल्ह्यातील नागरिकांनी पोलीस दलास चांगले सहकार्य केले असून त्याबाबत आभार व्यक्त केले.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, मागील वर्षी पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील गणेश मंडळांना डी.जे. / डॉल्बीमुक्त व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले होते. पोलीस दलाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत जिल्ह्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपरिक वाद्य वाजवून गणेशोत्सव सण साजरा केला. तसेच जिल्हा पोलीस दलाकडून वेळोवेळी काही सूचना देण्यात येत असतात त्याचेही त्यांनी काटेकोरपणे पालन केले, त्यामुळेच जिल्हा पोलीस दल डी.जे. / डॉल्बीमुक्त जिल्हा व इतर समाजोपयोगी उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करु शकले. जिल्ह्यातील विविध गणेश मंडळ गणेशोत्सव काळातच नव्हे तर वर्षभर पोलीस दलास सहकार्य करीत असतात. सण / उत्सावाच्या काळात पोलीस दलावर अतिरीक्त ताण येत असतो, परंतु जिल्ह्यातील बऱ्याच गणेश मंडळांनी पोलीस दलाच्या मदतीला स्वयंसेवक नेमून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यात हातभार लावलेला आहे. डी.जे./ डॉल्बीमुक्त जिल्हा जनजागृती होण्यास जिल्ह्यातील विविध गणेश मंडळ, डी.जे./डॉल्बी मालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक इत्यादींचे मोलाचे सहकार्य प्राप्त झाल्यामुळे नंदुरबार जिल्हा डी.जे./डॉल्बी मुक्त होण्यास मदत झाली असून त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले.
मागील वर्षी गणेशोत्सव काळात गणेश मुर्तीची स्थापना व विसर्जन मिरवणूकीत डी.जे. / डॉल्बीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करणे इत्यादी अनेक निकष पूर्ण करणाऱ्या गणेश मंडळांना उत्कृष्ठ गणेश मंडळांचा प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. त्यात 1) नदुरबार शहरातील साक्री नाक्याचा राजा गणेश मित्र मंडळ 2)नंदुरबार तालुका पेालीस ठाणे हद्दीतील नवनिर्माण गणेश मित्र मंडळ, आष्टे 3) उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील मानाचा निळकंठ गणपती, नंदुरबार 4) वनीता विद्यालय गणेश मित्र मंडळ नवापूर 5) श्री. राम गणेश मित्र मंडळ, विसरवाडी 6) तुप बाजार गणेश मित्र मंडळ, शहादा 7) विठ्ठल रुखमाई गणेश मित्र मंडळ, म्हसावद 8) भोईराज गणेश मित्र मंडळ, सारंगखेडा 9) सातपुडा तरुण गणेश मित्र मंडळ, धडगांव 10)नवयुवक गणेश मित्र मंडळ, अक्कलकुवा 11) क्षत्रिय माळी गणेश मित्र मंडळ तळोदा 12) सार्वजनिक दादा गणेश मित्र मंडळ, मोलगी यांचा तसेच शहरातील माळीवाडा गणेश मंडळाचा विशेष सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी अनंत चतुदर्शच्या दिवशी ईद-ए-मिलादचा सण साजरा न करता दिनांक 01/09/2023 रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्ह्यातील सिरत कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री. एजाज बागवान व सहाकारी सदस्य यांचा देखील विशेष सत्कार पालकमंत्र्यांचा हस्ते करण्यात आला.
तसेच वर्षभर विविध सण, उत्सव, महापुरुषांची जयंती, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त इत्यादी वेळी उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या जिल्हा पोलीस दलातील नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे यांचेसह सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांचा देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याचप्रमाणे पत्रकार संघाच्यावतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.पी.आर. पाटील यांचा पुष्पगुच्छ देवून यावेळी सत्कार करण्यात आला
जिल्ह्यातील 20 डी.जे. / डॉल्बी धारक व गणेश मंडळांनी एकमताने गणेशोत्सव काळात डी.जे. / डॉल्बी न वाजविता पारंपरिक वाद्यांचा वापर करुन गणेशोत्सव सण साजरा करण्याचे जाहिर करुन स्वयंस्फूर्तीने डी.जे. व डॉल्बी सिस्टिम वाहन जिल्हा पोलीस दलाकडे स्वेच्छेने जमा करुन वाहनांच्या चाव्या नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.श्री.डॉ.बी.जी.शेखर पाटील यांचेकडे सुपुर्त केल्या.
कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व प्रतिष्ठीत नागरिकांपैकी नंदुरबार येथील श्री. मोहन माळी, श्री. निंबा माळी, श्री. प्रवीण पाटील, श्री. महादू हिरणवळे, शहादा येथील श्री. कांतीलाल टाटीया व अक्कलकुवा येथील श्री. कय्युमभाई पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच यावर्षी गणेश स्थापना काळात सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करणे, श्री गणेश स्थापना व विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलालाचा वापर न करता फुलाच्या पाकळ्यांचा वापर करणे, वेळेच्या पूर्वी विसर्जन मिरवणूक संपविणे, श्री गणेशाचे जागेवर विसर्जन करणे, गणेशोत्सव काळात समाजहितासाठी प्रबोधनपर उपक्रम किंवा कार्यक्रम राबविणे, गणेशोत्सव काळात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून श्री गणेश स्थापनेच्या ठिकाणी CCTV कॅमरे बसविणे, पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश उत्सव साजरा करणे, स्वयंसेवक नेमून शिस्त पाळणारे गणेश मंडळ इत्यादी निकष पूर्ण करणारे गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसासाठी गणेश मंडळांची निवड करण्यात येणार असल्याचे जाहिर करण्यात आले होते.
कार्यकममाची
सदर कार्यक्रमाचे वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार खेडकर यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पोलीस अंमलदार व जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांचे सुमारे एक ते दीड हजार पदाधिकारी उपस्थित होते.