लोअर परळ उड्डाणपूल नागरिक कृती समिती
पूल बंद, "चालू" सरकार
सदर समिती तर्फे बुधवार, दि.13/09/2023 रोजी सायंकाळी ठीक 5:00 वा. विभागातील प्रतिष्ठित नागरिक, महिला वर्ग, व्यापारी संघ आणि चाकरमाने ह्यांच्या माध्यमातून. तसेच, राजमाता जिजाऊ सेवा-भावी संस्थेच्या सहकार्याने लोअर परळ ब्रिजची सहल अश्या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण ह्या सहलीत सहभागी होऊन गणेश चतुर्थी पूर्व उड्डाणपुलाचे काम पूर्ण करून सदर पूल नागरिकांसाठी खुला करावा ह्या मागणीसाठी करी रोड नाका, येथे एकत्र येऊन झोपलेल्या लोकप्रतिनिधी आणि सरकारला जागं करण्यासाठी एकत्र यावे.
पायाभूत सुविधांच्या उभारणीत आगामी किमान १०० वर्षांचा विचार हवा, असे मानले जाते. आपल्याकडे ब्रिटिशांनी बांधलेले अनेक वास्तू अजूनही ठणठणीत आहेत आणि नंतर आपण बांधलेले वास्तू मात्र लगेचच शंभरी भरते.
याबाबत आपणास सार्वत्रिक कमीपणा वाटायला हवा. पण सगळ्यांचे मूल्यमापनही आपण पक्षीय आपपरभावातून करणार असू तर अशा कमकुवत सुविधांची उभारणी अशीच अव्याहत सुरु राहील. एखादे काम कोणी केले यापेक्षा कसे केले यावर मूल्यमापन हवे.
पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केवळ काही उभारून दाखवणे इतकेच महत्वाचे नसते. जे काही उभारले जात आहे त्याचा दर्जा काय, त्याचे आयुष्य किती आणि त्याच्या उपयुक्ततेचा आवाका किती है प्रश्न त्यापेक्षा अधिक महत्वाचे असतात.
पण अलीकडे एका वर्गास “आमचे (च) ते सर्वोत्तम” असे वाटू लागले आहे.
त्यात चार करोडचे भंगार कोणी पळवले तरी चालेल. होय चार करोड!
है टाळायचे असेल तर आपल्या संपूर्ण अर्थव्यवस्थेभोवती असलेले कंत्राटदारांची मगरमिठी सोडवायला हवी. म्हणजे असे की सार्वजनिक क्षेत्रातील अनेक कामे जनतेच्या निकडीपेक्षा कंत्राटदारांची गरज डोळ्यासमोर ठेवून केली जातात किंवा काय, असा प्रश्न पडलाय. अनेक शहरांतील उड्डाणपूल, ‘स्कायवॉक’ नावाने ओळखली जाणारी थोतांडी रचना, सौंदरीकरण म्हणजे रोषणाई असे मानून काढली जाणारी कामे, रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडणे आणि दरवर्षी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी भरगच कंत्राटे निघणे अशी अनेक उदाहरणे या संदर्भात देता येतील. त्या सगळ्यातून सत्ताधीश आणि कंत्राटदार त्यांचे हितसंबंध तेवढे दिसून येतात. तसेच अशा कामांत गती ही सकारात्मकता निदर्शक असतेच असे नाही, है लक्षात घेणे गरजेचे आहे. एखाद्या कामातील नुसत्या गतीपेक्षा त्या कामाची गत काय झाली है पाहण्याची सवय लागली तर हा आपला राष्ट्र दोष दूर होईल. त्यासाठी पक्षीय आपपरभाव त्यागणे आपणास जमणार का हा प्रश्न.