गणेशमूर्ती हा लाखो हिंदूंच्या अस्थेचा विषय, मूर्तीवर शिक्का मारणे मान्य नाही
- पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
मुंबई, ११ सप्टेंबर –
गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना या काळात पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीत महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्राद्वारे कळवले आहे.
“गणेश उत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे, मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व आहे, प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत मी स्वतः महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी बोललो आहे.” असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.