सिनेट निवडणुकांना कुलगुरूंनी दिलेली स्थगिती तात्काळ हटवा; अन्यथा.. राष्ट्रवादीचे राज्यपालांना पत्र
ईमेल द्वारे पत्र पाठवून सिनेट निवडणूक लवकरात लवकर घेण्याची विनंती केली
मुंबई
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून मध्येच तात्काळ त्याला पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली. 10 सप्टेंबर रोजी मतदान होणार होते. तर,13 सप्टेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र अचानक या सिनेट निवडणुकीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी राज्यपाल रमेश बेस याना पत्र लिहून कुलगुरूंनी दिलेली स्थगिती हटवण्याची मागणी केली आहे.तर जर कुगुरूंनी दिलेली स्थगिती उठवली नाही तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव घालेल असा इशारा हि दिला.
या पत्रामध्ये ते म्हणाले… महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, 2016 याच्या कलम 72 चे पोट कलम 10 आणि कलम 71 चे पोट कलम 13 व कलम 67 याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात वापर करून मुंबई विद्यापीठाने एक वर्षांपूर्वी अधिसभा ( सिनेट ) निवडणूक सन २०२२ घेणे अपेक्षित होते. एक वर्ष आगोदर कार्यकाल संपून देखील निवडणुका घेत नाही,ही लोकशाहीची गळचेपी आहे.
गेली एक वर्ष रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणुक 10 सप्टेंबर रोजी होणार होती. या स्थागितीमुळे मुंबई विद्यापीठावर कोणाचा दबाव आहे का ? असा सवाल हि त्यांनी केला आहे. तसेच एका वर्षा पासून विद्यापीठाचा मनमानी चालला आहे. विद्यापीठाकडून परीक्षेचे निकाल देखील सहा महिन्यापासून रखडवले गेले आहेत. निकाल न लागण्याने नवीन शैक्षणिक वर्षांमध्ये प्रवेश मिळणार कि नाही याची चिंता विद्यार्थी व पालकांना लागली असल्याची खंत व्यक्त केली आहे.
अशा अनेक घटनांवर विद्यापीठ प्रशासन डोळेझाक करत आहे. आणि अशातच आता सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम रद्द करून विद्यापिठाने मनमानी कारभार चालू केला आहे. त्यामुळे राज्यपाल महोदयानी या विषयात गांभीर्याने लक्ष घालून हि स्थगिती लवकरात लवकर उठवावी अशी विनंती ॲड.मातेले यांनी केली आहे.