भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा
पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत 'घर चलो' अभियानात भाग घेणार
मुंबई
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे २० ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्याला प्रारंभ करणार असून पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघात ‘घर चलो’ अभियानात सहभागी होणार आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदार संघापासून आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा आरंभ होणार असून या अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात ३ कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारच्या आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती पोहचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल , असे श्री . बावनकुळे यांनी गुरुवारी सांगितले . भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये , माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन , नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, प्रवक्ते अतुल शाह आदी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघांत हे अभियान राबविले जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून ३ कोटी नागरिकांपर्यंत पोहचण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असून एका महिन्यात हे उद्दिष्ट साध्य केले जाईल. घरोघरी जाऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या ‘सरल अॅप’ मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती थेट पोहचविणे, नवमतदारांची नोंदणी करणे ही कामेही या अभियानात केली जातील.
यावेळी श्री . बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला. श्री. बावनकुळे म्हणाले की, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरात राज्यात फ्रेंड्स ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी, युवा वॉरियर्स असे वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानात राज्यातील मोदी सरकारच्या योजनांच्या २ कोटी लाभार्थींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे एकत्रित करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रातील नामवंतांना ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या माध्यमातून पक्षाच्या संपर्कात आणले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ५० हजार रुग्ण मित्र तयार करण्याचे अभियानही सुरु करण्यात आले आहे.
मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानात आपण स्वतः सहभागी झालो. २०२४ च्या निवडणुकीत मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर यावे यासाठी मतदान करण्याची नागरिकांची इच्छा असल्याचे या अभियानात आपल्याला दिसून आल्याचेही श्री. बावनकुळे यांनी नमूद केले