शनिवारी ठाण्यात ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’
विजय कुमार यादव
ठाणे
ओबीसी एकीकरण समिती, महराष्ट्र, ओबीसी प्रतिष्ठान आणि मराठा सेवा संघ, ठाणे यांंच्यावतीने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथे शनिवार 12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 ते 2 या वेळेत ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ हा या सोहळ्याचं आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात माउलींच्या पालखीचं अश्वरिंगण सोहळा व टाउन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार, कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांचं सुश्राव्य कीर्तन पार पडणार आहे. यावेळी, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे, नाशिक, नगर या जिल्ह्यातील वारकरी सांप्रदायातील नामवंत मंडळी एकत्र उपस्थित राहून एक ‘अद्भूत सोहळा’ ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. या सोहळ्यात ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक मराठा सेवा संघ,ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे व ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी केले आहे. या सोहळ्यासाठी आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील पादुकांचे आयोजक प्रफुल वाघोले यांनी श्री क्षेत्र आळंदी देवाची आणि श्री क्षेत्र देहू भंडारा देवस्थान येथे त्यांची विधीवत अभिषेक करून वारी सोहळ्यात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
‘अवघाचि संसार करिल निधार्र। नामाचा गजर सर्वकाळ॥ या संत नामदेव महाराजांच्या ओवीमध्ये भुतलावर राहणार्या प्रत्येक सुखी संसाराची काळजी वाहिलेली दिसते. यामध्ये समतेचा, विश्व बंधुत्वचा आणि कुटुंब व्यवस्थेचा आनंदी संदेश सहजासहजी पोहचतो. या विचारातून प्रेरीत होत समाजातील सर्व घटकांना ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ या संकल्पनेतून एकत्र जोडण्याचं कार्य ठाण्यात शनिवारी आयोजित सोहळ्यानिमित्त होणार आहे. यावेळी कोर्ट नाका येथे शासकीय विश्रामगृहाजवळून वारकरी मंडळींच्या वारीला सुरूवात होईल. महिला, पुरुष, मुले पारंपारिक वेशभुषेत हातात दिंड्या – पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, रस्त्यावर रांगोळीचा सडा अशा मंगलमय वातावरणात टाळ-मृदूंगाचा गजर करत वारकरी पुढे सरकतील. त्यानंतर टॉउनहॉलजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करत जवळच उभारलेल्या श्री विठ्ठलाच्या पुर्णाकृती पुुतळ्यास पुष्पहार अपर्ण करून सहभागी सर्व सामाजिक संस्था, वारकरी मंडळी आपल्या विविध मागण्यांचे, समस्यांची शिदोरी (पत्र) सोडून ती विठ्ठलाच्या चरणी अर्पण करून मायबाप सरकारकडे गार्हाणे मांडतील. ती पत्रं मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांंच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचवतील. ङ्गअगदी पंढरपुरच्या वारीत होतो त्याप्रमाणे आणि ज्या वारकर्यांना विठुरायाची आस असते त्यांच्यासाठी ‘याचि देही याचि डोळा’ असा अभूतपूर्व ‘वारी मानवतेची, वारी समानतेची’ सोहळा ठाणेकरांना पहायला, अनुभवायला मिळणार आहे.