महामंडळाचा 2021-22 वर्षाचा 1 कोटी 34 लाखाचा लाभांश शासनाला सुपूर्द
राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे सांस्कृतिक मंत्री श्री.सुधीर मुनगंटीवार यांनी लाभांश धनादेश सुपूर्द केला.
विजय कुमार यादव
मुंबई दि.9 :
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 2021-22 या वित्तीय वर्षाचा 1 कोटी 34 लाख 15 हजार 733 एवढ्या रक्कमेच्या लाभांशाचा धनादेश राज्याचे सांस्कृतिक मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवार, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे बुधवारी मंत्रालय येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केला.
यावेळी राज्याचे उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री.अजित पवार, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री.विकास खारगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महामंडळाची स्थापना ही कंपनी कायद्यानुसार झाली असून शासननिर्णय दिनांक 22 फेब्रुवारी 2012 नुसार निव्वळ नफ्याच्या किमान 5 टक्के लाभांश महामंडळ शासनाला देत आहे. 2021-22 साली महामंडळाला 26 कोटी 83 लाखाचा निव्वळ नफा झाला होता. सन 2004 पासून महामंडळ नफ्यात असून तेंव्हा पासून शासनास लाभांश दिला जात आहे. आतापर्यंत 12 कोटी 73 लाखाचा लाभांश शासनाला देण्यात आला आहे.अशी माहिती महामंडळाचे वित्तीय लेखा अधिकारी श्री. राजीव राठोड यांनी दिली. या कार्यक्रमाला महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक श्रीम.गीता देशपांडे, कलागरे व्यवस्थापक श्री.विजय भालेराव उपस्थित होते.