ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात “पंचप्रण शपथ” उपक्रम उत्साहात संपन्न
जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी दर्शविली उपस्थिती
ठाणे,
दि.09(जिमाका):
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत पणती प्रज्वलित करुन “पंचप्रण शपथ” जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) गोपीनाथ ठोंबरे, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, तहसिलदार संजय भोसले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्वांनी “आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू”, ही पंचप्रण शपथ ग्रहण केली.