उद्घाटनानंतरही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह बंदच ; राष्ट्रवादी आक्रमक
मुंबई विद्यपीठाचा बेभान कारभार
मुंबई
प्रतिनिधी
मुंबई विद्यापीठाने सांताक्रुझ येथील कलिना संकुलात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असे वसतिगृह उभे केले. त्याचे उद्घाटन जुलै २०२२ मध्ये तत्कालीन कुलपती व माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. परंतु एक वर्षाच्या कालावधीनंतरही हे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आलेले नाही. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरीही अद्याप हे वसतिगृह वापरात आलेले नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी विद्यापीठाच्या कार भारावर रोष व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठीचे नवीन वसतिगृह हे सहा मजली आहे. १४६ विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतिगृहात वाचन कक्ष, ग्रंथालय आदी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. सध्या मुंबई विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्नित महाविद्यालयात जवळपास २०० आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकत आहेत.
या विदयार्थ्यांना कलिनापर्यंतचा प्रवास दूरवरून करावा लागत आहे. ज्यामुळे विदयार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. विदयापीठातील मुलांचे आंतरराष्ट्रीय वसतिगृह सुरु केले तर विदयार्थ्यांचा प्रवासाचा खर्च आणि वेळ वाचेल याची जाणीव ठेऊन लवकरात लवकर सुरु करावे अशी मागणी अॅड. अमोल मातेले यांनी कुलगुरूंना ई-मेल द्वारे पत्र पाठवून केली आहे.