“बीएफए’ अभ्यासक्रमाच्या फी वाढी संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना पत्र.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना ईमेल द्वारे पत्र
मुंबई
प्रतिनिधी
नव्याने स्थापन झालेल्या ‘सर. जे. जे. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यालय’ या अभिमत विद्यापीठात बॅचरल ऑफ फाइन आर्ट (बीएफए) अभ्यासक्रमाच्या फी वाढी संदर्भात समाज माध्यमांवर शक्यता वर्तवली जात असून यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भातील सरकारची भूमिका स्पष्ट करून विध्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करावा अशी मागणी केली आहे.
‘सर. जे. जे. कला, वास्तुकला आणि अभिकल्प विद्यालय’ या अभिमत विद्यापीठात बॅचरल ऑफ फाइन आर्ट (बीएफए) अभ्यासक्रमाची फी २६ पट वाढण्याची शक्यता समाज माध्यमांद्वारे पसरवली जात आहे. सध्या या अभ्यासक्रमासाठी वार्षिक ७,५०० रुपयांचे शुल्क आकारले जाते. त्यात वाढ होऊन ते दोन लाख रुपयांपर्यंत तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे शुल्क तीन लाख रुपयांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी संघटनांकडून नाराजीचा सूर उमटत आहे. फी दरवाढीचा घोळ घालून विद्यार्थांना लाखो रुपयांसाठी साठी वेठीस धरण्याचे काम जोरात सुरु आहे.जेणेकरून हे विद्यार्थी शिक्षण घेऊ नयेत असा या सरकारचा मानस दिसत आहे.ह्या दुटप्पी मानसिकतेचा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने निषेध करीत आहोत असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान,अभिमत विद्यापीठासाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालावरून (डीपीआर) ही बाब समोर आली आहे. या अभ्यासक्रमासाठी होतकरू,हुशार परंतु सामजिक दृष्टीने व आर्थिकदृष्ट्या वंचित असे विद्यार्थी प्रवेश घेतात.ह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यामागचा विद्यार्थांचा उद्देश फक्त सर्वोत्तम शिक्षण प्राप्त करणे होय परंतु या कोर्स साठी भरमसाठ फी वाढ होणार असेल तर होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात.सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावे. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने फी वाढी संदर्भात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा हि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड.अमोल मातेले यांनी दिला आहे.