जत भागात पाण्याची तीव्र टंचाई ; दुष्काळी भाग घोषित करा
पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी तात्काळ योजना कराव्यात
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी
मुंबई :-
जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करण्याची मागणी करत काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी विधानभवनाच्या पाऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांनी या आंदोलनाला भेट देत आपले समर्थन दर्शवले. यावेळी आमदार राजू आवळे, आमदार संजय जगतापही उपस्थित होते.
याबद्दल सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, जत हा दुष्काळी भाग आहे. येथील ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई आहे. या गावात पाण्याचे दुर्भिक्ष असतेच त्यात यंदा अजूनपर्यंत हवा तसा पाऊस झालेला नाही. पाण्याची तीव्र टंचाई गांभीर्याने घेत या भागात पाण्याची टँकरची व्यवस्था केली पाहिजे तसेच इतरही महत्वाच्या उपाययोजना करायला हव्यात अशा सुचना त्यांनी केल्या. या भागातील काही गावे आम्हाला कर्नाटकात पाठवा अशी मागणी करत आहेत हे अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने यात वेळीच लक्ष घालावे असा इशाराही त्यांनी दिला.
पुढे बोलताना जयंत पाटील असेही म्हणाले की, मागच्या काळात महाविकास आघाडी सरकार असताना माझ्याकडे जलसंपदा विभागाची जबाबदारी होती. त्यावेळी या भागातील पाण्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत आम्ही म्हैसाळ विस्तारित पाण्याची योजना आखली होती. या योजनेच्या सर्व गोष्टीची पूर्तता झाली आहे. या सरकारने तात्काळ या योजनेचे काम सुरू करायला हवे.