मराठा आरक्षणासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणार
मराठा महासंघाच्या दिल्लीतील आंदोलनात खासदार राहुल शेवाळे यांची भूमिका
नवी दिल्ली,
मराठा आरक्षणासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत मराठा बांधवांना साथ देणार, अशी भूमिका खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्लीतील आंदोलनादरम्यान मांडली.
मराठा आरक्षणाबाबत त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दिल्लीच्या जंतर – मंतर येथे मंगळवारी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
या उपोषणाला शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने भेट दिली; या शिष्टमंडळात शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन किर्तीकर, भावना गवळी, सदाशिव लोखंडे, कृपाल तुमाने, अप्पा बारणे, धैर्यशील माने, संजय मंडलिक, हेमंत गोडसे यांचा समावेश होता. शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने या उपोषणाला भेट देऊन मराठा आरक्षणाला आपले समर्थन दिले. तसेच पदाधिकाऱ्यांनी दिलेले निवेदन स्वीकारून, आरक्षणाच्या या लढाईत यशस्वी होईपर्यंत साथ देण्याचे वचन उपोषणकर्त्यांना देण्यात आले.