लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती ;
वास्तू विशारद संस्थेकडून वास्तु आराखड्याचे सादरीकरण
मुंबई,
गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या वास्तू आराखड्यासाठी विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यांतर्गत आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत विविध वास्तू विशारद संस्थांकडून सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला आता गती येणार आहे.
मंत्री श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संगीत महाविद्यालयासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, ज. जी. वास्तुशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे, अधीक्षक अभियंता प्रमोद गोसावी, मुख्य वास्तु शास्त्रज्ञ आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी जागेची निवड करण्यात आली आहे. वास्तू आराखडा (डिझाइन) विविध वास्तु विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वास्तु विशारद संस्थांचाही प्रतिसाद मिळत आहे. या स्पर्धेंतर्गत वास्तु आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या वास्तु विशारद संस्थांचा पुरस्कार देवून सन्मान देखील केला जाणार आहे. लवकरच या महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन केले जाणार असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाणार आहे.