ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत साकारली पहिली ‘थिंक बिग स्पेस’
ठाणे महानगरपालिकेच्या शाळेत साकारली पहिली ‘थिंक बिग स्पेस’
• विज्ञान-तंत्रज्ञान, गणित आणि कला यांचे थेट प्रशिक्षण
• संगणकीय तांत्रिक कौशल्यांचा होणार विकास
• ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते झाले उद्घाटन
विजय कुमार यादव
ठाणे ०३ ,
महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तंत्रकौशल्यांचा अभ्यास व्हावा तसेच, विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि कला यांचे थेट प्रशिक्षण मिळावे यासाठी ठाणे महानगरपालिका, अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस (एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज), लर्निंग लिंक्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महानगरपालिकेच्या शाळेतील पहिल्या ‘थिंक बिग स्पेस’चे उद्धाटन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या हस्ते बाळकूममधील शाळा क्रमांक ६० आणि ११२ येथे नुकतेच झाले.
‘थिंक बिग स्पेस’ हा जागतिक उपक्रम आहे. STEAM म्हणजेच (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीरिंग, आर्टस् आणि मॅथमॅटिकस), विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि कला हे विषय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून हाताळता यावेत. हे या उपक्रमाचे सूत्र आहे. त्यात, संगणकीय तंत्रज्ञान, त्यातील किट्स विद्यार्थ्यांना हाताळता येणार आहेत. विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान, अद्ययावत लॅपटॉप, अलेक्सा, डीआयवाय किट्स, टेक्निकल किट्स या गोष्टी या उपक्रमात प्रत्यक्ष वापरता येतील.
या लॅबची रचना, टॅब, प्रोजेक्टर, वर्गखोलीची सजावट आदी गोष्टी एडब्ल्यूएस इनकम्युनिटीज यांनी केल्या आहेत. वर्षभर ते या लॅबचे व्यवस्थापन करणार आहेत. सध्या या लॅबचा वापर २२० विद्यार्थी करणार आहेत. त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर महापालिकेच्या इतर शाळांतील विद्यार्थ्यांनाही या लॅबला भेट देता येईल.
‘थिंक बिग स्पेस’ या जागतिक उपक्रमाचा लाभ ठाणे महानगरपालिकेच्या शाळेला मिळतो आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. आमच्या महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि कला या विषयांचा थेट अभ्यास करता येईल. ही एक चांगली संधी महापालिका शाळांतील मुलांना मिळाली आहे. हा उपक्रम प्रेरणादायी आहे, असे आयुक्त श्री. बांगर यांना सांगितले.
तसेच, अशाप्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा विचार करण्यास आणि स्वप्ने पाहण्यास कोणतीही सीमा नसते. शिवाय, ती साकारही करता येतात, असा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होईल. ठाण्यातील शाळांमधून या उपक्रमासाठी महापालिका शाळेची निवड करण्यात आली. यातून या शाळांमधील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता आणि क्षमता सिद्ध होते, असेही आयुक्त श्री. बांगर यावेळी म्हणाले.
आपण सगळ्यांना एकत्र काम केले, तर हे विद्यार्थी या जागतिक व्यासपीठाचा सदुपयोग करू शकतील. त्यातून त्यांना अदयावत ज्ञान मिळेल आणि या सर्व विषयांबद्दलची जिज्ञासा त्यांच्यात जागृत होईल, असा विश्वासही आयुक्त श्री. बांगर यांनी व्यक्त केला.
शालेय विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटिलिजन्स सारख्या विषयांची ओळख करून देण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. ज्यांच्यापर्यंत अशा सुविधा पोहोचत नाहीत, त्या वर्गालाही या सुविधांचा आणि त्यातून मिळणाऱ्या संधीचा लाभ मिळावा, हा या मागचा उद्देश आहे. ठाण्यात हा उपक्रम सुरू करतो आहोत आणि त्याला ठाणे महानगरपालिकेचे सहकार्य लाभले आहे, ही आमच्यासाठीही समाधानाची बाब असल्याचे प्रतिपादन अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसच्या जपान, चीन आणि आशिया विभागाच्या डेटा सेंटर ऑपरेशनच्या संचालक साजी पी. के. यांनी केले.
याप्रसंगी, आयुक्त श्री. बांगर यांनी आठवी इयत्तेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तंत्रज्ञानाविषयी त्यांच्यात असलेली सजगता, उत्सुकता जाणून घेतली. तसेच, शाळेतील सुविधा, वाचनाची आवड याविषयी विद्यार्थ्यांकडून माहितीही घेतली. कार्यक्रमानंतर, आयुक्त श्री. बांगर यांनी शाळेतील वाचनालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांसोबत वाचनालयात जाऊन विद्यार्थ्यांनी जी पुस्तक वाचली होती, त्याची आयुक्तांनी माहिती घेतली. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाविषयी असलेली गोडी बघून शाळांमधील वाचनालये अद्यावत करण्याच्या सूचना आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.
या कार्यक्रमास माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर, कॉर्नेलिया रॉबिन्सन आणि गायत्री प्रभू, तसेच, पालिकेचे शिक्षण उपायुक्त उमाकांत गायकवाड उपस्थित होते.