समृद्धी महामार्गावरील अपघातांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना करण्याची गरज – अजित पवार
समृद्धी महामार्गावर बुलडाणा येथे झालेल्या बस अपघाताबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त
समृद्धी महामार्गावरील बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
मुंबई,
दि. १ जुलै –
नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवाय दुर्घटनेत जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली.
समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.