मुंबई नाका परिसरातील मुख्य चौकात फुले दाम्पत्यांचे पुतळे बसविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन
मुंबई नाका परिसरातील मुख्य चौकात फुले दाम्पत्यांचे पुतळे बसविण्यासाठी कार्यवाही करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून मनपा प्रशासनाला इशारा
नाशिक,
दि.३० जून :-
नाशिक शहरातील मुंबई नाका परिसर (सावित्रीबाई फुले चौक) येथील मुख्य चौकात फुले दाम्पत्यांचे पुतळे बसविणेबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने मनपा प्रशासनाला दिला आहे. आज समता परिषद व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने मनपा प्रभारी आयुक्त भाग्यश्री बनायात यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, शहराध्यक्ष कविताताई कर्डक, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, समता परिषदेच्या महिला शहराध्यक्ष आशाताई भंदुरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहर सरचिटणीस संजय खैरनार, शशी हिरवे, मकरंद सोमवंशी, नाना पवार, अक्षय परदेशी, अमोल नाईक, रवींद्र शिंदे, मीनाक्षी काकळीज, कृष्णा काळे, श्री.त्रिभुवन, गिरीश बच्छाव, पुष्पलता राठोड, चैतन्य देशमुख, प्रशांत वाघ, रितेश केदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, थोर समाजसुधारक क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य भावी पिढीला मार्गदर्शक ठरावे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणेसाठी सावित्रीबाई फुले चौक, मुंबई नाका येथील मुख्य चौकात त्यांचे ब्रांझ धातूमधील संयुक्त पुतळे बसविण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने वेळोवेळी केलेली मागणी आजतागायत प्रलंबित आहे. या पुतळ्यांसाठी महानगरपालिकेच्या २०२२-२३ व २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे या पुतळ्यांसाठी आवश्यक असणारे सर्व विभागांचे ना हरकत दाखले नाशिक महानगरपालिकेस प्राप्त झालेले आहेत तसेच नाशिक महानगरपालिका,नाशिक यांच्या ठराव क्र.१३४ दि. १४.०३.२०२३ रोजी महासभेने ठराव मंजूर केलेला आहे. प्रशानाच्या हलगर्जीपणामुळे अजूनही सदर चौकात पुतळे बसविण्यात दिरंगाई होत असल्याबाबत लक्ष वेधले आहे.
पुढे म्हटले आहे की, या संयुक्त पुतळ्यांबाबतची पुढील कार्यवाही तातडीने करून लवकरात लवकर सावित्रीबाई फुले चौक ,मुंबई नाका,नाशिक येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे संयुक्त पुतळे बसविणेत यावेत अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,नाशिक आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मार्फत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्व जबाबदारी नाशिक महानगरपालिका व प्रशासनाची असेल हे असा इशारा देण्यात आला आहे.