भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (शांताराम तलाव) आणि स्वा. सावरकर मैदानाचा लोकार्पण सोहळा संपन्न
मुंबई,
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत मालाड (पूर्व) कुरार व्हिलेज येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (शांताराम तलाव) आणि स्वा. सावरकर मैदान व संरक्षक भींतीवरील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा २७ जून २०२३ रोजी संपन्न झाला. माननीय आमदार मिहीर कोटेचाजी यांच्या हस्ते मालाड (पूर्व) येथील विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डिजीटल माध्यमातून मालाडमधील विकासकामांचे कौतुक केले. ‘मुंबई शहर आपल्या देशाचा मानबिंदू आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत पायाभूत सुविधा या जागतिक स्तराच्या असल्या पाहिजे असा आमचा आग्रह आणि प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे मेट्रो जाळे, खड्डेमुक्त रस्ते, सुशोभिकरणाचे मोठे प्रकल्प अशी मोठ मोठी कामे हाती घेतली जात आहेत. वर्षानूवर्षे येथे होत असलेला गणेशोत्सव, नवरात्री आणि छटपुजा दरम्यान आता नागरिकांना नक्कीच सुखद अनुभव येईल. या उद्यानाबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानाच्या नुतनीकरणाचे कामसुद्धा उत्तम झाले आहे. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धांसाठी ते आता सज्ज झाले असून खेळाडूंना तिथे नवी अनुभूती येईल असा मला विश्वास आहे. तसेच विकासकामांमुळे मालाड प्रभागा क्र. ४३ चा चेहरा मोहरा बदललेला आहे.’ असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी व्यक्त केले. मुंबईचा कायापालट करत असताना नागरिकांची साथ खूप मोलाची असते तसेच राज्य शासन नेहमीच मुंबईकरांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहे असे म्हणत मालाडमधील सर्व स्थानिकांचे त्यांनी आभार मानत भरभरुन कौतूक केले.
आमदार मिहीर कोटेचाजी यांनीसुद्धा मालाडमधील विकासकामांचे कौतुक केले. ‘केंद्र आणि राज्यातील सरकारच्या स्वच्छ आणि पारदर्शी कामामुळे विकासकामे वेगात होत आहेत. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे अद्भूत, सुंदर आणि स्वच्छ वास्तू उभ्या राहू शकतात याची प्रचीती मालाड पूर्व येथील तलाव, उद्यान आणि मैदानाच्या माध्यमातून मिळाली आहे’ असे कोटेचेजी म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान (शांताराम तलाव) आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान व संरक्षक भींतीवरील सुशोभीकरणाचे कोटेचाजी यांनी ही विशेष कौतुक केले.
पी उत्तर विभाग मालाड पूर्व व पश्चिम येथील एकून अठरा नैसर्गिक तलावांपैकी एक असणारा हा तलाव असून स्थानिकांच्या धार्मिक भावना त्यासोबत जोडलेल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान आणि तलावाचे सुशोभिकरण करताना त्यात अत्याधुनिक रोषणाई तसेच सर्व वयोगटातील नागरिकांचा विचार करुन बैठक व्यवस्था तसेच मनोरंजन साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. तलावात मासे, कासव, बदक आणि हंस मोठ्या प्रमाणात आहेत. धकाधकीच्या जीवनात मालाडवासियांना सुख, शांती आणि समाधान तसेच उत्तम आरोग्यासाठी या उद्यानाचा मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान आणि संरक्षक भींतीचे सुशोभीकरणही भव्य-दिव्य पद्धतीने करण्यात आलेले आहे. अत्याधुनिक सोयी-सुविधांचा वापर करुन स्थानिकांचे जीवन अधिक सुखकर आणि आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न या विकासमकामांद्वारे झालेला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण
आणि स्वा. सावरकर मैदानाचे काम रखडले होते. अखेर नगरसेवक श्री. विनोद मिश्राजी यांच्या अथक प्रयत्नांमुळे मालाडमधील उद्यान आणि मैदानाचा कायापालट झाला असून मालाड (पूर्व) कुरार व्हिलेजच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे असेच म्हणायला हवे. मंगळवारी झालेल्या लोकार्पण सोहळ्यात मान्यवरांसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मालाडवासिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.