सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा
- कुलपती रमेश बैस
मुंबई,
सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी अध्यक्षीय भाषणात काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.
संतांची व कलावंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात आज हा सोहळा होत आहे. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ओळखल्या जाणारे या विद्यापीठ व बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही ‘शिक्षा भूमी’ आहे.
आजपर्यंत विद्यापीठाचे ६२ दीक्षांत सोहळे यशस्वी झाले आहेत. या सोहळ्यांना राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, डॉ.एपीजे अब्दुल कलाम, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, विद्यापीठाच्या माजी विद्यार्थीनी निरुपम राव, न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्यासह अनेकांनी हजेरी लावली आहे. तर यंदाच्या सोहळ्यास ‘एआयु’च्या महासचिव डॉ.पंकज मित्तल यांची उपस्थिती आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘नॅक’चे ’अ’मूल्यांकन प्राप्त असे राज्य विद्यापीठ आहे. देशातील सर्वाधिक नेट-सेट-जेआरएफ विद्यार्थी, संशोधकांची संख्या आहे. तसेच बार्टी, सारथी, महाज्योती, राजीव गांधी फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांची संख्याही सर्वाधिक याच विद्यापीठात आहे.
शिक्षण घेत असतानांच स्वावलंबन अर्थार्जनासाठी ’कमवा व शिका योजना’ ही वैशिष्ट्यपूर्ण योजना विद्यापीठात सुरु आहे. ‘कोविड’च्या काळात विद्यापीठाने सामाजिक बांधिलकीचे विविध उपक्रम राबविले. यामध्ये दोन कोविड टेस्टिंग लॅब सुरु करण्यात आल्या. तसेच मुख्यमंत्री सहायता निधीत दीड कोटींची भर विद्यापीठाने घातली. ‘व्हायरॉलॉजी’ सारखा महत्वपूर्ण अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरु केला आहे. ही समाधानाची बाब आहे.
तरुणांना स्पर्धेच्या युगात केवळ पदवीच्या आधारे नव्हे तर ज्ञान, कौशल्याच्या बळावर स्वतःचे करिअर घडवावे लागेल भारताला महासत्ता बनविण्याचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तरुणांवर आहे, असेही राज्यपाल श्री. बैस म्हणाले.