नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुमारे एक किलो एमडी केले जप्त
श्रीश उपाध्याय/मुंबई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने परदेशी पोस्ट ऑफिसमधून एमडी ड्रग्ज पुरवल्याच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. एनसीबीने सुमारे एक कोटी रुपयांच्या 996 ग्रॅमच्या 2000 एमडी गोळ्या जप्त केल्या आहेत.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की,
एनसीबीला गुप्त माहिती मिळाली होती की, आफ्रिकन ड्रग डीलर डार्क नेटद्वारे ड्रग्जची खरेदी-विक्री करत आहेत. तांत्रिक माहिती आणि गुप्तहेरांच्या मदतीने नेदरलँडमधून टिनच्या डब्यात भरून अमली पदार्थांची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे एनसीबीने 20 जून रोजीच फॉरेन पोस्ट ऑफिसला अलर्ट जारी केला होता. संशयास्पद पार्सलची तपासणी केली असता त्यामध्ये एमडी ड्रग्स आढळून आली. प्रकरणाचा तपास केल्यानंतर असे आढळून आले की, हे पार्सल नालासोपारा येथील रहिवासी जॉन संडे याने मागवले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जॉनला पकडले असता त्याच्याकडून बनावट भारतीय पासपोर्ट सापडला. त्याने ड्रग्ज मागवल्याची कबुली दिली. 2021 मध्ये देखील जॉनला ड्रग पेडलिंग प्रकरणात एनसीबीने पकडले होते. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.