बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल

ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांचे मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न

विजय कुमार यादव

ठाणे : केवळ टोलेजंग इमारतींमुळे शहराचा विकास होत नाही तर, शहरातील नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाबी, विरंगुळ्यासाठी उद्याने, खेळासाठी मैदाने या महत्त्वाच्या बाबींची गरज आहे. त्यातूनच ठाणे शहरातील चित्र बदलते आहे. रस्ते मोठे झाले, शहराचे सौंदर्यीकरण झाले, शहराचा विकास झपाट्याने होत असून येत्या काही दिवसात ठाणे ते बोरीवली हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करणे शक्य होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात केले.

वाहतूक कोंडीतून ठाणे शहराला मुक्त करण्यासाठी काम सुरू आहे. निरोगी शहर उभे करण्यात येत आहे. त्यादृष्टीने आजचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले जात आहे. आपल्या शहरांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार झाले पाहिजेत. मुलांमध्ये कौशल्य आहे, त्यांच्यासाठी व्यासपीठ देण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. विकासाची ही कामे जनतेच्या पैशातून होत आहेत. त्यामुळे त्यात गुणवत्तेत कोणतीही तडजोड होता कामा नये, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या सोहळ्यात स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात राज्य सरकारच्या अनुदानातून हाती घेतलेल्या तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा रविवारी काशिनाथ घाणेकर नाटयगृह येथे झाला. या कार्यक्रमात, राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा. श्री. विजयकुमार गावित, आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष श्री. विवेक पंडित, आमदार श्री. प्रताप सरनाईक, माजी आमदार श्री. रवींद्र फाटक, माजी महापौर श्री. नरेश म्हस्के, सौ. मिनाक्षी शिंदे, श्री. अशोक वैती, माजी नगरसेवक देवराम भोईर, माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे आणि संजय भोईर, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, माजी नगरसेवक पुर्वेश सरनाईक, ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त श्री. दिलीप ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आदिवासी बांधवांसाठी विविध माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. त्यामुळे एक श्रद्धास्थान म्हणून आदिवासी बांधव शिंदे यांच्याकडे पाहतात, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. तसेच, महानगरपालिकेला मिळालेल्या सुविधा भूखंडावर आदिवासी मुलींच्या वसतीगृहाचे काम आज सुरू होत आहे. ३२० मुलींची व्यवस्था तेथे केली जाणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न् केल्याचा उल्लेख श्री. गावित यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे कसे असावे, याचे प्रात्यक्षिक आज आपण या कार्यक्रमात पाहतो आहोत. ठाणेकरांनी न मागता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी भरभरून दिले आहे. त्यांना ठाणेकरांच्या मनात काय आहे ते लगेच कळते. त्यामुळे सूर्या धरणातून ठाण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नही करत आहात. सूर्यामधून भविष्यात मिळणारे २५० एमएलडी पाणी मिळाले तर या भागाचा पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, असे आमदार प्रताप सरनाईक या समारंभात म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना, ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या कार्यक्रमात फार मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामे होत आहेत. जी कामे सुरू झाली आहेत त्याचे वास्तव आता डोळ्यासमोर स्पष्ट दिसू लागले आहे. या कामांचे वैशिष्ट्य म्हणजे या कामांची गुणवत्ता ही सर्वोच्च रहावी यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वतः आग्रही आहेत. वारंवार आम्हाला त्याबद्दल सूचना करतात, मार्गदर्शन करतात. केवळ मार्गदर्शन करून थांबत नाहीत तर साईट वर येऊन कामाची गुणवत्ता चांगली आहे का नाही हे पाहतात. त्यामुळे सगळी यंत्रणा सतत दक्ष राहते, असेही आयुक्त श्री. बांगर म्हणाले.

कासारवडवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र, शिवसेनाप्रमुख हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजिटल अक्वेरियम या दोन वास्तूंचे भूमिपूजन मा. मुख्यमंत्री महोदय यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी केले. तर, ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर, महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृह यांचे लोकार्पण, आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थिनी वसतिगृह, कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र यांचे भूमिपूजन रिमोटद्वारे काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात केले.

या कार्यक्रमात, कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्राच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने ओजस प्रवीण देवतळे, अंजली गोपीचंद स्वामी, प्रथमेश जावकर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या तिरंदाजपटूंचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. खेळाडूंसह राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाचे संचालक आणि अर्जुन पुरस्कार विजेते संजीवकुमार सिंग, विश्व तिरंदाजी संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर उपस्थित होते.

प्रकल्पांची माहिती

ठाणे महापालिका क्षेत्रात, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक स्व. बाबुराव मारुतीराव सरनाईक जिमनॅस्टिक सेंटर हा महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील प्रकल्प आहे. टाटा सिरीन या कंपनीने हे सेंटर उभारले आहे. सुमारे ३५०० चौ. मी. जागेवर, क्रीडा प्रेक्षागृह, व्यायामशाळा, विश्रांती गृह, प्रशिक्षक कक्ष आदी सुविधा या सेंटरमध्ये आहेत. राष्ट्रीय स्तरावरील जिमनॅस्टिकच्या स्पर्धा येथे घेता येणार आहेत.
पोखरण रस्ता क्रमांक दोन येथे बेथनी रुग्णालयाशेजारी महामानव शिव, शाहू, फुले, आंबेडकर स्मृती सभागृह बांधण्यात आले आहे. त्यासाठी ४ कोटी रुपये खर्च आला आहे.
तसेच, पोखरण रस्ता क्रमांक दोन येथील कै. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र (६.५ कोटी), कासारवडवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विपश्यना केंद्र (१४ कोटी), भाईंदरपाडा येथील ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावरील आदिवासी विकास विभागाच्या विद्यार्थिनी वसतिगृह आणि शिवसेनाप्रमुख हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान व डिजिटल अक्वेरियम (५० कोटी) यांचे भूमिपूजन मा. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button