भिवंडीतील टोरेंट वीज कंपनीकडून वीजग्राहकांची लूटमार :- राजेश शर्मा
राज्यातील सर्वात महागडी वीज भिवंडीकरांनाच कशासाठी? भरमसाठ वीजदर कमी करा अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारु.
मुंबई, दि. १७ जून
महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना देशातील सर्वात जास्त महागडा वीज दर आकारला जात आहे. हा वीज दर ७ रुपये प्रति युनीट आहे. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असताना जनतेला हा महागड्या वीजेचा शॉक सहन करावा लागत आहे. भिंवडीत तर यापेक्षा जास्त महागडा वीजदर आहे. टोरेंट वीज कंपनी भिवंडीत ९.६४ रुपये युनीट वीज दर आकारून जनतेची लूट करत आहे. टोरंट कंपनीने जनतेची ही लूट थांबवावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून जाब विचारेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिला आहे.
यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, दिल्लीत वीजेचा दर २.५० रुपये आहे, हरियाणामध्ये २.५० रुपये, हिमाचल प्रदेशमध्ये २.७५ रुपये, महाराष्ट्रात ७.०० रुपये तर भिवंडीत ९.६४ रुपये दर आकारला जात आहे. टोरेंट या खाजगी वीज कंपनीकडे भिवंडीला वीज वितरण करण्याचे काम दिलेले आहे. टोरेंट कंपनीच्या मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी येत आहेत. भिवंडीकरांना एवढी महागडी वीज देण्याचे कारण काय? भिवंडीत वीज काय सोन्याच्या तारांपासून येते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शेजारच्या शहापूरमध्ये ७ रुपये वीज दर आहे मग भिवंडीतच वीज महाग का? टोरेंट कंपनीच्या या लूटमारीविरोधात जनतेत तीव्र संताप आहे. टोरेंट कंपनीने हा वीज दर कमी करावा अन्यथा मोठे आंदोलन केले जाणार आहे.
कर्नाटकात काँग्रेस सरकारने २०० युनीटपर्यंत वीज माफ केली आहे पण महाराष्ट्रात जनतेची लूट सुरुच आहे. टोरंटसारख्या खाजगी वीज कंपन्या नफेखोरी करत जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. भाजपा सरकार व स्थानिक खासदार जे केंद्रात मंत्री आहेत तेही भिवंडीकरांच्या या लुटमारीकडे लक्ष देत नाही म्हणून काँग्रेस पक्षाने जनतेच्या हितासाठी हा प्रश्न हाती घेतला असून टोरंट कंपनीच्या या मनमानी वीज आकारणीला तीव्र विरोध करत आहे, असेही शर्मा म्हणाले.