बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

पोलीसांचा लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना – महेश तपासे

पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा; वारकर्‍यांवर लाठीचार्ज करणारी व काळीमा फासणारी घटना दडपण्याचा प्रयत्न...

महाराष्ट्र शांत राखण्याची, धार्मिक सलोखा राखण्यासाठी, महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे…

भाजप श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवायला भाग पाडणार…

 

मुंबई

दि. १२ जून –

आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेला अमानुष लाठीचार्ज म्हणजे महाराष्ट्राच्या ३०० वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी तीव्र नाराजी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

दरम्यान जे सरकार स्वतः ला हिंदूत्ववादी सरकार बोलते त्या सरकारकडून वारकर्‍यांवर लाठीचार्ज होतो हे कितपत योग्य आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे असे सांगतानाच पालकमंत्र्यांच्या पोलिसांनी लाठीचार्ज करून वारकर्‍यांचा अपमान केला आहे त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी यावेळी केली.

वारकर्‍यांवर लाठीचार्ज झालाच नाही असे वक्तव्य पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्तांनी केले तर दुसरीकडे तीच री गृहमंत्र्यांनी ओढली. मात्र समाजमाध्यमांवर फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाला तो बोलका आहे त्यामुळे वारकर्‍यांवर लाठीचार्ज करणारी व काळीमा फासणारी घटना दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

वारकर्‍यांवर लाठीचार्ज करून सरकारचे प्रमुख कुठल्या तोंडाने विठ्ठलाच्या दर्शनाला जाणार आहेत असा टोलाही महेश तपासे यांनी लगावला.

गेल्या काही दिवसापासून राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर, कोल्हापूर असेल किंवा नांदेडमधील दलित तरुणाची हत्या असेल, छत्रपती संभाजीनगरमधील घटना असेल, किंवा त्र्यंबकेश्वरमधील घटना असेल यामागे राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे का किंवा जाणुनबुजुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का असा संशयही महेश तपासे यांनी यावेळी उपस्थित केला.

काही घटनांमध्ये जुन्या इतिहासाचे दाखले दिले जातात. काही तरुण औरंगजेबाचे पोस्टर झळकवतात. या गोष्टी होत असताना राज्यात पोलीस यंत्रणेची कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम असताना त्यांच्याकडून ते काम होत नाही. धार्मिक हिंसाचारामुळे त्या – त्या शहराचे नुकसान होत आहे हे काही दिवसातून लक्षात येत आहे. या घटनांतून महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्र शांत राखण्याची, धार्मिक सलोखा राखण्यासाठी, महाराष्ट्राचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असे आवाहन महेश तपासे यांनी यावेळी केले.

रविवारी मुंब्रात हिंदू – मुस्लीम समता रॅली काढण्यात आली. एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आमच्या मुंब्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका असे आवाहन या रॅलीत करण्यात आले. त्याबद्दल मुंब्राकरांचे महेश तपासे यांनी विशेष आभार मानले.

धार्मिक ध्रुवीकरणाच्या घडामोडी घडत असताना आदरणीय शरद पवारसाहेब यांना सोशल मिडियावर धमकी देणार्‍या सागर बर्वे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोस्ट टाकणे व ती फॉरवर्ड करणे हा गुन्हाच आहे. मात्र अशाप्रकारच्या विचारांना, कृतीला समर्थन देणे ही भूमिका भाजपच्या कार्यकर्त्याच्या कृतीतून स्पष्ट होते. ही भूमिका आणि त्याचे संरक्षण करणे, त्याची पाठराखण करणे म्हणजे ख-या अर्थाने भाजपला पवारसाहेबांना आलेली धमकी याचे किती गांभीर्य आहे यातून स्पष्ट होत आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसने रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या कार्यक्रमात पवारसाहेबांनी दोन कार्याध्यक्ष निवडले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचा समावेश आहे. या निवडीचे स्वागत राज्यासह देशभरात झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची व्याप्ती देशभरात वाढवायची आहे. ती व्याप्ती वाढत असताना नवीन नेतृत्वाने पुढे येण्याची गरज होती. तशी भूमिका पवारसाहेबांनी मांडली होती. त्यावेळी पवारसाहेबांनी दिलेला राजीनामा हा कार्यकर्त्यांना धक्का होता. तो राजीनामा न देता नवीन नेतृत्व पुढे आणावे ही भूमिका घेतली गेली आहे असे सांगतानाच बिहारमध्ये होणाऱ्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याला पवारसाहेब जाणार आहेत असेही महेश तपासे यांनी सांगितले.

कर्नाटकच्या निवडणूकीत ४० टक्के कमिशनचा मुद्दा गाजला होता. गेल्या दहा महिन्यापासून राज्यात शिंदेचे सरकार आहे. आता कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात अधिक घट्ट होऊ लागला की काय अशी शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे. तिकडे ४० टक्क्यांचा विषय होता तोच कमिशनचा पॅटर्न महाराष्ट्रात सध्या सुरू झाला आहे. असा कमिशनखोरीचा प्रकार मंत्र्यांचे पीए करताना आढळत आहेत. आमच्या महाविकास आघाडी सरकारला वसुली सरकार म्हणत होते त्यांच्या या दहा महिन्याच्या कालावधीतील कारभार समोर येत आहे. त्यामुळे मंत्र्यांचे पीए किंवा अधिकारी कमिशन घेत असतील तर ती प्रकरणे उघडी पाडल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस गप्प बसणार नाही असा इशाराही महेश तपासे यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवली म्हणजे ही धुळफेक आहे असे फडणवीस यांनी वक्तव्य केले आहे. हा आमच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार असतील या सर्वांना विश्वासात घेऊन अशापध्दतीने भाकरी फिरवण्याचा कार्यक्रम पवारसाहेबांनी केला. संघटनेची राज्याची जबाबदारी जयंत पाटील यांच्यावर आहे तर विधीमंडळाची जबाबदारी अजितदादांवर आहे. कामांचे वाटपही झाले आहे त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबीवर फार बोलण्याची आवश्यकता नाही. भाकरी फिरवण्यास सुरुवात झाली आहे त्याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनतेला पूर्णपणे दिसेल असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

 

आमच्यामध्ये समन्वय नाही. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांच्यामध्ये तणाव आहे अशा बातम्या शिंदे गटाचे व भाजप प्रवक्ते देत होते. आता कल्याण – डोंबिवली जागा पाहिली तर डॉ. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. त्या जागेवर भाजपची एक वर्षापासून नजर आहे. भाजपने ही जागा इतकी प्रतिष्ठेची केली आहे की, श्रीकांत शिंदे यांना राजीनामा द्यावा लागला तरी चालेल पण वाद नको असे वक्तव्य करावे लागले. याचा अर्थ एकच आहे भाजपने श्रीकांत शिंदे यांना टार्गेट करून उर्वरित दहा खासदार आहेत त्यांना कसे टार्गेट करु हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.भाजप या सर्वांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी अन्यथा राजकीय संन्यासाला सामोरे जावे लागेल अशी अट घालेल असा विश्वासही महेश तपासे यांनी व्यक्त केला.

या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, सिध्दीविनायक मंदिराचे विश्वस्त सुनील गिरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button