शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी विविध मागण्यांसाठी किसान सभेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी विविध मागण्यांसाठी किसान सभेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा
# जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या समवेत शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
# 3 महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास तलासरी ते मंत्रालय विशाल किसान लॉंग मार्च निघणार
पालघर. (प्रतिनिधी) – शेतकऱ्यांच्या जमिनीविषयीच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे व आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी गोविंद बोडके यांच्या समवेत किसान सभेच्या शिष्टमंडळाची अडीच तास सकारात्मक चर्चा झाल्याने उक्त आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास दि. 10 ऑक्टोबर 2023 या हुतात्मा दिनी आणि कॉ. गोदावरी परुळेकर यांच्या स्मृतिदिनी तलासरी ते मंत्रालय असा जबरदस्त किसान लॉंग मार्च काढण्यात येईल असा थेट इशारा किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिला.
यावेळी पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, जव्हार, मोखाडा, विक्रमगड, आणि वाडा या 08 तालुक्यातून साधारण 25 हजार शेतकऱ्यांचा समावेश या मोर्चात होता. या मोर्चात प्रामुख्याने 01) ताब्यात असलेली 04 हेक्टर पर्यंतची वनजमीन मंजूर करून 7/12 कब्जेदार सदरी नोंद करा. 02) सर्व अपात्र वन दावे त्वरित मंजूर करा. 03) वरकस जमीन कसणारांच्या नावावर करा. 04) गायरान, देवस्थान, इनाम, महसुली जमीन कसणारांच्या नावावर करा. 05) घरांची तळ जमीन नावावर करा आदी मागण्या होत्या. यावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. तर आमच्या एकूण 20 मागण्या होत्या त्यापैकी ज्या जिल्हाधिकारी यांच्या अत्यारीतल्या नाहीत आणि ज्या शासनाच्या धोरणात्मक विषयी आहेत त्या मंत्रालय स्थरावर पाठपुरावा करण्यात येतील अशी माहिती आ. निकोले यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोकडे यांनी वन दाव्यांचे 61 हजार अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 51373 दावे मंजूर करून वाटप करण्यात आले आहेत. 6615 दावे नामंजूर करण्यात आले आहेत. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कडून मार्गदर्शन सूचना मागविल्या आहेत तसेच, झाडांचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल यांची कबुली देखील बोकडे यांनी दिली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, उप जिल्हाधिकारी संजय जाधवर, वन विभागाचे निरंजन दिवाकर उपस्थित होते. तर शेतकऱ्यांनी तालुकानिहाय आणलेले हजारो अर्ज महसूल तहसीलदार चंद्रसेन पवार यांनी सही शिक्का देऊन स्वीकारले. कुर्जे व उधवा येथे 150 पेक्षा अधिक दावे प्रलंबित असल्याचे माजी राज्य अध्यक्ष किसन गुजर यांनी लक्षात आणून दिले.तर पालघर – ठाणे जिल्ह्यात प्रचंड पाणी साठे आहेत परंतु, येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची खंत किसान सभेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना यांनी व्यक्त केली.
अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, माजी राज्य अध्यक्ष किसन गुजर, किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले, राज्य अध्यक्ष उमेश देशमुख, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, राज्य सरचिटणीस प्राची हातिवलेकर, 128 डहाणू (अ. ज.) विधानसभा आमदार विनोद निकोले, ठाणे-पालघर माकप जिल्हा सचिव किरण गहला, किसान सभेचे ठाणे-पालघर जिल्हा सरचिटणीस चंदू धांगडा, किसान सभेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत घोरखाना, डीवायएफआय चे राज्य अध्यक्ष नंदकुमार हाडळ आदी पदाधिकारी व हजारो कार्यकर्ते व शेतकरी स्त्री-पुरुष उपस्थित होते.