मनपाच्या निष्काळजीमुळे मुंबई या पावसात तुंबणार का?….. नसीम खान
नसीम खान यांचा मिठी नदी व मोठे नाल्यांचा पाहणी दौरा
मुंबई
आज माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो.आरिफ (नसीम) खान यांनी मुंबईत विविध ठिकाणी पावसाळा येण्याअगोदर मिठी नदी तसेच मोठ्या नाल्यांची पाहणी दौरा केला.
पवई ते माहीम खाडीपर्यंत अंदाजे 19 किलोमीटर मिठी नदीमधील गाळाची खालपर्यंत साफसफाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले, तसेच विविध ठिकाणी मोठे नाल्याचे सुद्धा संपूर्णपणे साफसफाई झाले नसल्याचे दिसून आले
मिठी नदी व नाले साफसफाई करणारे ठेकेदार व मनपाचे काही अधिकारी यांच्या संगनमतामुळे व निष्काळजीपणामुळे पावसाळा येण्याअगोदर साफसफाई झाली नाही. साफसफाईच्या नावाखाली शेकडो करोडचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला.
नसीम खान यांच्या पाहणी दौरा दरम्यान असे दिसून आले की काही काही ठिकाणी 6 फूट खोलवर असलेल्या नाल्यामध्ये मधील फक्त 1 फुटापर्यंत गाळ काढण्यात आला आहे तर उर्वरित 5 फूट नाल्यांमधील गाळ तसेच राहिलेला आहे.
क्रांतीनगर बैल बाजार सहार एअरपोर्टच्या भिंतीजवळ असलेल्या मिठीनदी मधील गाळ खालपर्यंत काढलेला नाही तसेच मुंबईत ठिकठिकाणी विकासाच्या नावाखाली रस्ते खोदुन ठेवले असून मंद गतीने काम सुरू आहे. यावर्षी हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितले आहे की पावसाळा जूनच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे असे असताना सुद्धा मुंबईच्या विविध ठिकाणी मंद गतीने सुरू असलेले काम, मिठी नदी व मोठे नाल्याची न झालेली साफसफाई यामुळे यावर्षी मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे नसीम खान यांनी सांगितले.
याबाबतीत नसीम खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच मनपा आयुक्त इकबाल सिंग चहेल यांना ट्विट करत मागणी केली आहे की मुंबईकरांना पावसाळ्यात त्रास होऊ नये म्हणून ठेकेदार व अधिकाऱ्यांमार्फत होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी व पावसाळा येण्याअगोदर मुंबईतील मिठी नदी, मोठे नाले तसेच विविध ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावी अशी नसीम खान यांनी मागणी केली आहे