कर्नाटकात भाजपाच्या हुकूमशाही व भ्रष्टाचाराविरुद्ध काँग्रेसवर जनतेचा विश्वास – नसीम खान
मुंबई
कर्नाटक मध्ये काँग्रेस पक्षाला बहुमताने विजय केल्याबद्दल आज टिळक भवन दादर येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात प्रदेश कार्याध्यक्ष मो. आरिफ (नसीम) खान यांच्या नेतृत्वाखाली विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना नसीम खान म्हणाले की, देशाची लोकशाही व संविधान संपविणारे लोक, जातीपातीचे राजकारण करणारे लोक, देशाचा विकास संपणारे लोक, बेरोजगारी वाढवणाऱ्या लोकांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांना कर्नाटकमधील जनतेने सपशेल नाकारले असून देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी लढणाऱ्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर व काँग्रेस पक्षावर कर्नाटक मधील जनतेने विश्वास व्यक्त केला आहे.
नसीम खान पुढे म्हणाले की, केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करणाऱ्या व राहुलजी गांधी यांच्यावर खोट्या केसेस करून त्यांचे लोकसभा सदस्यत्व काढून घेणा-या आणि त्यानंतर लगेचच त्यांना बेघर करण्याच्या भाजप सरकारच्या कृतीविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप आहे त्यांच्या या कृतीला प्रतिउत्तर देत कर्नाटकच्या जनतेने भाजपाला धडा शिकवला असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत कर्नाटक मध्ये काँग्रेसला भरघोस मताने निवडून आणले आणि कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आणली आहे.
कर्नाटक प्रमाणेच महाराष्ट्रातही डबल इंजिन असल्या शिंदे सरकारचाही महाराष्ट्रातील जनता सफाई केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही नसीम खान यांनी यावेळी व्यक्त केला.
या विजय जल्लोष कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात एकमेकांना मिठाई वाटून विजयोत्सव साजरा केला. यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, राजन भोसले, प्रमोद मोरे, विनय राणे, झिशान अहमद, नासीर हुसेन यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.