राष्ट्रवादीचे नेते अमित शहा यांना भेटले हा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा चुकीचा आणि आधारहीन – महेश तपासे
मुंबई
दि. ४ मे –
राष्ट्रवादीचे नेते भाजपला समर्थन देण्यासाठी अमित शहा यांना भेटले अशा ऐकीव माहितीवर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केले ते पूर्ण चुकीचे आहे त्याला कोणताही आधार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यावर खुलासा केला आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेत महेश तपासे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा हा दावा खोडून काढला आहे.
राष्ट्रवादीचे विचार सेक्यूलर, समतावादी, समाजवादी असून त्यामुळे भाजपसोबत कोणत्याही प्रकारची तडजोड राष्ट्रवादीची किंवा नेत्यांची नाही किंवा बैठकही झालेली नाही त्यामुळे असे चुकीचे विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी करु नये असा सल्लाही महेश तपासे यांनी दिला आहे.
२ मे रोजी पवारसाहेबांनी राजीनामा दिला त्यानंतर बर्याच वर्तमानपत्रांनी सर्व्ह केला की, महाविकास आघाडीचे काय होणार परंतु त्यांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्रित, एकदिलाने, एक विचाराने, ताकदीने उभी राहणार आणि महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करणार असा स्पष्ट दावा महेश तपासे यांनी यावेळी केला.
बाजार समितींच्या निवडणूका असतील किंवा त्याअगोदर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका असतील, त्याअगोदर विधानपरिषदेचा लागलेला निकाल लक्षात घेता सगळीकडे महाविकास आघाडीला विजय मिळत आहे. पवारसाहेबांच्या निवृत्तीचा विपरित परिणाम न होता उलट महाविकास आघाडी व देशपातळीवर भाजप विरोधात असलेले लहानमोठे पक्ष एकत्र करण्यात ताकद मिळणार आहे असेही महेश तपासे म्हणाले.
पवारसाहेबांचा अवाका राष्ट्रीयस्तराचा आहे म्हणून पवारसाहेबांनी तात्काळ निर्णय घेतल्यानंतर स्वाभाविक सगळ्यांना धक्का बसला आहे. पवारसाहेबांना मानणारा वर्ग महाराष्ट्रासह देशभरात आहे. त्यामुळे साहेबांना भेटायला येणार्यांची गर्दी वाढत आहे असेही महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.