प्रत्येकाला न्याय मिळेल असे काम प्रशासनात केले पाहिजे
- मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव
मुंबई,
प्रशासनात काम करतांना सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याबरोबरच त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने ही भावना लक्षात ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे, असे प्रतिपादन मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचा कार्यगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनोगत व्यक्त करतांना श्री. श्रीवास्तव बोलत होते. या कार्यक्रमास वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग. दि.कुलथे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.श्रीवास्तव म्हणाले की राज्यात 1987 ला आलो तेव्हा एकाही व्यक्तीचा परिचय नव्हता. या सेवेमुळे मला मराठी भाषा शिकता आली, त्यामुळे अनेक मित्र आणि शुभचिंतकाशी जोडला गेलो. प्रशासनात काम करताना कामानिमित्त अनेक अधिकाऱ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली व त्यातून अनेकांशी ऋणानुबंध तयार झाले. माझ्या व्यक्तिमत्त्वावर वडीलांचा प्रभाव आहे. प्रशासनात चांगले वाईट लोक संपर्कात येतील. अशा प्रत्येक प्रसंगात स्थिर आणि शांत राहण्यातच स्वतःचे कौशल्य आहे, तसेच सर्वसामान्य माणसाच्या कामाला नेहमी प्राधान्य दिले गेले पाहिजे, ही वडिलांची शिकवण सेवेत पाळली, सर्वांशी चांगले संबंध जोपासले. मुख्य सचिव म्हणजे कुटुंबप्रमुख म्हणून काम करताना प्रशासन आणि जनतेतून सहकार्य मिळाल्याने यशस्वी काम करू शकलो, असे त्यांनी सांगितले.
या कार्यगौरव सोहळ्याच्या आयोजनाबाबत त्यांनी सामान्य प्रशासन विभाग व राजपत्रित अधिकारी महासंघाचे आभार मानले. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग.दि. कुलथे, विनोद देसाई, समीर भाटकर, सोनल स्मित पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव तसेच राजपत्रित अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ सहाय्यक संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर आभार महासंघाचे उपाध्यक्ष विष्णू पाटील यांनी मानले.
मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव हे दि. ३० एप्रिल २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्री. श्रीवास्तव हे दि. १ मार्च २०२२ पासून राज्याच्या मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. ते मूळचे उत्तरप्रदेशातील असून १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मनु कुमार श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर व नागपूरचे जिल्हाधिकारी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले. नगरविकास तसेच महसूल व वन विभागांतील त्यांची कारकीर्द विशेष उल्लेखनीय अशी होती. मुख्य सचिव म्हणून कार्यरत असताना, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे महत्वाचे प्रश्न त्यांनी सहानुभूतीपूर्वक हाताळले. राज्य शासनाच्या सेवेतील अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी “महाउत्सव २०२२” भव्यदिव्य कार्यक्रम त्यांच्या कारकिर्दीत आयोजित करण्यात आला.