धर्मादाय रुग्णालयांबाबत आदर्श कार्यप्रणाली तयार करा
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत
मुंबई,
धर्मादाय अंतर्गत येणाऱ्या रूग्णालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा व सवलतीच्या दरात उपचार मिळणे आवश्यक आहे. यादृष्टीने सर्व धर्मादाय रुग्णालयांसाठी आदर्श कार्यप्रणाली तयार करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी दिले.
धर्मादाय रुग्णालयाच्या कामकाजासंदर्भात आरोग्यमंत्री श्री. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, आरोग्य विभागाचे आयुक्त धीरज कुमार, धर्मादाय आयुक्त महेंद्र महाजन यांच्यासह सार्वजनिक आरोग्य, विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावंत म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना जलद व तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी विभागाने धर्मादाय रुग्णालयात राखीव असलेल्या दहा टक्के उपलब्ध खाटांची माहिती देणारे ॲप प्राधान्याने तयार करावे. तसेच हे ॲप सर्वसामान्य नागरिकांना सहज हाताळता येईल, असे असावे. रुग्णांची शिधापत्रिका आणि तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांसाठी अडवणूक होऊ नये, अशा सूचनाही मंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिल्या.
धर्मादाय रुग्णालयात आरोग्य सेवक पदाची भरती आरोग्य विभागाकडून तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आरोग्य सेवाकामार्फत योग्य ती मदत अधिक तत्परतेने मिळेल. या योजनांचा लाभ अधिकाधिक गरीब आणि दुर्बल रुग्णांना मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले