राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी
भाजप नेते आचार्य पवन त्रिपाठी, तेजिंदर सिंग तिवाना यांनी डीसीपींना पत्र दिले
हिंदूंच्या विरोधात अभद्र वक्तव्यामुळे हिंदू समाजात संताप
मुंबई
माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवी-देवता आणि हिंदू सणांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात भाजप नेत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. हिंदू सणांच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर अशोभनीय वक्तव्य करून, जितेंद्र आव्हाड यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन, आव्हाड यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती मिरवणुकीला जातीयवादी ठरवून, समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करत, मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी आव्हाडांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. आचार्य त्रिपाठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू देवतांबद्दल अशोभनीय वक्तव्य केले. आव्हाड सातत्याने हिंदू देवता, हिंदू आणि हिंदुत्वावर अवमानकारक वक्तव्य करत आहेत. एएनआयने दिलेल्या ट्विटनुसार आव्हाड यांनी लिहिले की, असे दिसते की रामनवमी आणि हनुमान जयंती केवळ दंगल पसरवण्यासाठी आहे. या दंगलींमुळे शहरातील वातावरण बिघडत आहे. मला वाटते की येणारे दिवस जातीय दंगलीचे असतील. घाटकोपर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत आव्हाड यांनी वरील वक्तव्य केले.
आचार्य पवन त्रिपाठी म्हणाले की, “श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती हे हिंदूंचे प्रमुख सण आहेत, जे हजारो वर्षांपासून हिंदू समाज साजरे करत आहे. हिंदू स्वतःला श्रीरामाचे वंशज मानतात आणि हनुमानजी हे श्रीरामाचे परम भक्त आहेत, ज्यांना संकटमोचक म्हणतात!” आव्हाडांचे हिंदू समाजाच्या विरोधातील हे वक्तव्य महापालिका निवडणुकीत राजकीय फायद्यासाठी देण्यात आल्याचे त्रिपाठी यांचे म्हणणे आहे. आगामी निवडणुकीत अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी केलेल्या अशा विधानांना विरोध करताना त्रिपाठी म्हणाले की, कोट्यावधी जनता ज्या हिंदू देवी- देवतांना पुजते, त्यांच्या विरोधात अशा विधानांची गरज नाही. एका चांगल्या हेतूने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आव्हाड यांनी फालतू वक्तव्य केल्यामुळे, हिंदू समाज दुखावला आहे. राजकारणी म्हणून आव्हाड यांनी नीट विचार करून बोलले पाहिजे आणि कोणत्याही एका समाजाच्या बाजूने किंवा विरोधात बोलू नये. त्यांची विधाने, हावभाव आणि स्वर यामुळे हिंदू समाजाची प्रतिमा इतर समाजाच्या मनात डागाळली आहे.
आव्हाड यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारे पत्र मुंबई भाजपचे उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने झोन-10 चे पोलीस उपायुक्त महेश रेड्डी यांना दिले आहे. शिष्टमंडळात मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना, भाजपचे उत्तर पश्चिम मुंबई सरचिटणीस मुरजी पटेल आणि माजी नगरसेवक पंकज यादव यांचा समावेश होता.