बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

महापालिकांच्या मैदानांवर दिव्यांग क्रीडापटूंसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,

दि. 19 :

दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी महानगरपालिकांच्या मैदानांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता त्यांच्यासाठी अडथळामुक्त वातावरण तयार करण्यावर शासनाचा भर असून, त्यादृष्टीने आवश्यक सोयी सुविधा व्यापक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित राज्य शासन, मुंबई महानगरपालिका व प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘समावेश-मेकिंग मुंबई इनक्ल्युझिव्ह मोहिमे’चा शुभारंभ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी दिव्यांगांना व्हिलचेअरचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या बास्केटबॉलचा विशेष सामनाही यावेळी झाला.

कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सहकार मंत्री अतुल सावे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव अभय महाजन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रोजेक्ट मुंबई उपक्रमाचे संस्थापक शिशिर जोशी यांच्यासह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, दिव्यांग खेळाडूंना क्रीडा साहित्य, व्हिलचेअर वितरणाचा आजचा उपक्रम स्वागताहार्य आहे. दिव्यांग खेळाडूंना इतर सर्व खेळाडूंप्रमाणे समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आग्रही असून त्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पाहिले राज्य आहे. हा विभाग पूर्ण क्षमतेने कार्यरत असून या विभागामार्फत सद्यस्थितीत दिव्यांगांच्या सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने विविध विषय हाताळण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग नागरिकांसाठी सुलभरित्या येण्या-जाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे, त्यासाठी आवश्यक असलेला रॅम्प, सरकते जीने, दिव्यांगांसाठीची स्वच्छतागृहे यासह आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.

त्रिमूर्ती प्रांगणात मोठ्या उत्सुकतेने आणि उत्साहाने सर्व दिव्यांग खेळाडूंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी टप्पा देत मारलेल्या बॉलचा स्वीकार करत बास्केटबॉल सामन्याला जल्लोषात सुरवात केली. व्हीलचेअरवर बसून अतिशय चपळाईने एकामागोमाग एक या खेळाडूंनी बास्केटमध्ये बॉल फेकत उत्कृष्टपणे आपल्या क्रीडा कौशल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह उपस्थितांच्या टाळ्या आणि कौतुक घेतले. यावेळी या खेळाडूंसोबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी संवाद साधून त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. ‘समावेशक मुंबई अभियाना’बद्दल प्रोजेक्ट मुंबई संस्थेचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button