अंधेरीतील कामगार हॉस्पिटल सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका :- राजेश शर्मा
केंद्र सरकारने आश्वासन देऊनही अंधेरीतील कामगार हॉस्पिटल अद्याप बंदच.
अंधेरी येथील अद्ययावत कामगार हॉस्पिटल मागील चार वर्षांपासून बंद असल्याने ते सुरु करावे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले. यासंदर्भात केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने एक बैठकही घेतली होती तरिही अद्याप काहीच हालचाल झाल्याचे दिसत नाही. लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी दिली आहे.
यासंदर्भात माहिती देताना राजेश शर्मा म्हणाले की, अंधेरीतील कामगार हॉस्पिटल प्रश्नी केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या निर्देशानुसार केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सचिव आरती आहुजा यांनी मुंबईत एक बैठकही घेतली होती. या बैठकीत ESIC चे डायरेक्टर जनरल डॉ. राजेंद्र कुमार, राज्य सरकार व केंद्र सरकारचे उच्च अधिकारी, मी व उत्तर पश्चिम मुंबई जिल्हाध्यक्ष क्लाईव्ह डायस उपस्थित होते. काही तांत्रिक अडचणीमुळे हॉस्पिटल सुरु होण्यास विलंब होत आहे परंतु पुढील तीन महिन्यात OPD विभाग सुरु करु असे आश्वासन देण्यात आले होते. या बैठकीला तीन महिने होऊन गेले परंतु अद्याप कोणतीही आरोग्य सेवा सुरु करण्यात आलेली नाही.
लाखो कामगारांना उपचारासाठी दुसऱ्या हॉस्पिटलची सेवा घ्यावी लागत आहे. आश्वासन देऊनही हॉस्पिटल सुरु होत नसल्याने कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकार काहीच करत नसल्याने हे हॉस्पिटल लवकर सुरु व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने लाखो कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन न्याय द्यावा अशी अशा शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
अंधेरी येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या हॉस्पिटलमध्ये ५०० बेडस व मेडीकल कॉलेज होते. या रुग्णालयात OPD , IPD (350 बेड्स) ICU आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. OPD विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या. परंतु १७ फेब्रुवारी २०१८ रोजी या रुग्णालयात आगीची दुर्घटना घडून १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून हे रुग्णालय बंद आहे, असेही राजेश शर्मा म्हणाले.