नवी मुंबईला पूर्णकालिक शहर अभियंता केव्हा मिळणार ?
2 वर्षापासून अतिरिक्त प्रभार दिला आहे कार्यकारी अभियंता यांस
एखाद्या शहराचा सर्वागीण विकास करण्यासाठी शहर अभियंता हे पद महत्वाचे असते याचा कदाचित विसर नवी मुंबई महानगरपालिकेला पडलेला आहे यामुळेच नवी मुंबईत 2 वर्षापासुन कार्यकारी अभियंताच्या माथी शहर अभियंता पदाची जबाबदारी दिली आहे. ही माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीतून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नवी मुंबई महानगरपालिकेकडे शहर अभियंता बाबत विविध माहिती मागितली होती. नवी मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभागाचे प्रशासकीय अधिकारी उत्तम खरात यांनी अनिल गलगली यांस दिनांक 2 एप्रिल 2021चे तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशाची प्रत दिली आहे. या आदेशात असे नमूद करण्यात आले आहे की नवी मुंबई महानगरपालिकेत शहर अभियंता या पदावर कार्यरत असलेले सुरेंद्र वासुदेव पाटील हे नियत वयोमानानुसार दिनांक 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तर प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने आणि सार्वजनिक सेवेच्या हितार्थ संजय गोपाळ देसाई , कार्यकारी अभियंता यांना मूळ विभागाचे कामकाज सांभाळून शहर अभियंता या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश होईपर्यंत पहावयाचा आहे.
अतिरिक्त कार्यभार देताना शासनाच्या मंजुरीची प्रत, अतिरिक्त कार्यभाराची जास्तीत जास्त कालावधीची माहिती जाहिरातीची प्रत, प्रतिनियुक्तीवर अधिकारी पाठवण्यासाठी शासनाकडे केलेल्या पत्र व्यवहाराची प्रत अभिलेखावर उपलब्ध नसल्याचा दावा खरात यांनी केला आहे. अनिल गलगली यांनी 2 वर्ष शहर अभियंता सारखे पद अतिरिक्त कार्यभारावर देण्यामागचे गौडबंगाल काय आहे? अशी विचारणा करत चौकशीची मागणी मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि आयुक्तांकडे केली आहे. तत्काळ प्रभावाने राज्य शासनाने या पदावर योग्य व्यक्तींची निवड करण्याची मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.