माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दाव्यावर पंतप्रधानांनी तात्काळ खुलासा करावा – महेश तपासे
मुंबई
दि. १५ एप्रिल –
पुलवामात ४० जवान शहीद झाले आणि दुसरीकडे मोदी सरकारमध्ये भ्रष्टाचार आहे असा दावा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला असेल तर यावर तात्काळ पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ला हा बेपर्वाईमुळे झाला आहे असा खळबळजनक दावा केला आहे. यावर बोलण्यास पंतप्रधानांनी मज्जाव केला असाही आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा माहिती देऊनही कारवाई केली नाही असाही दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. माजी राज्यपालांनी केलेल्या खळबळजनक विधानावर सत्य जाणून घेण्याचा अधिकार जनतेला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० प्रभावशाली नेत्यांच्या यादीत स्थान मिळाले नाही याचे आश्चर्य वाटले नाही परंतु गेल्या नऊ वर्षांत हे सरकार जनतेच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे शिवाय महागाई, बेरोजगारी आणि जातीयवाद वाढत असल्याने भारताची सामाजिक जडणघडण विस्कळीत झाली आहे त्यामुळे मोदींची जादू ओसरली आहे असा थेट हल्लाबोलही महेश तपासे यांनी केला.