बातम्याभारतमहाराष्ट्रमुंबईलाईफस्टाईल
Trending

आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा

‘ना भूतो न भविष्यती’ अशा महासोहळ्याची जय्यत तयारी

हेलिकॉप्टरद्वारे होणार पुष्पवृष्टी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तयारीचा आढावा

मुंबई,

दि. 15:

राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना उद्या (रविवारी) 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर हा सोहळा होणार आहे. या महासोहळ्याची जय्यत तयारी खारघर येथे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: दोन वेळेस सोहळ्याच्या ठिकाणी भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. या सोहळ्याची इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम होईल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी सोहळ्याच्या आयोजनात सहभागी अधिकारी, कर्मचारी, श्री सदस्य यांना सोहळा यशस्वीतेसाठी आवाहन केले आहे.

सकाळी साडे दहाच्या सुमारास हा सोहळा होणार आहे. त्यासाठी महापालिका, सिडको, सार्वजनिक बांधकाम, पोलिस, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि श्री सदस्य त्यासाठी परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यादरम्यान, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह धर्माधिकारी कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यासाठी सुमारे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक, श्री सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन नियोजनपूर्वक काम सुरू आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहन तळ, वाहतुक सुरळीत राहण्यासाठीचे नियोजन याकडे लक्ष देण्यात येत आहे. नागरिकांना रेल्वे स्थानकापासून ते सोहळ्याच्या ठिकाणी नेण्यासाठी बसेसची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. सोहळ्याच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून सुमारे 250 टॅंकर आणि 2100 नळ बसविण्यात आले आहेत. वैद्यकीय सुविधा देखील तैनात करण्यात आली असून 69 रुग्णवाहिका, 350 डॉक्टर्स, 100 नर्स आणि कर्मचारी कार्यरत आहेत. 32 फिरते शौचालय, 4200 पोर्टेबल शौचालय, कार्यक्रमस्थळी 9000 तात्पुरते शौचालय बांधण्यात आली आहेत. स्वच्छता व्यवस्थेसाठी 60 जेटींग मशीन, 4000 सफाई कर्मचारी शिवाय 26 अग्निशमन वाहने उपलब्ध आहेत. पार्कींगसाठी 22 ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी 600 स्वयंसेवक, 200 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या सोहळ्याचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दोन वेळेस प्रत्यक्ष भेट देऊन तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सुनियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button